सिध्दनाथ तलाव पाच वर्षाने भरला
By Admin | Updated: September 1, 2014 23:08 IST2014-09-01T22:20:03+5:302014-09-01T23:08:51+5:30
दरीबडचीत समाधान : तीन गावाच्या शेतीला पाणी शक्य

सिध्दनाथ तलाव पाच वर्षाने भरला
दरीबडची : मान्सूनच्या दमदार पावसाने सिध्दनाथ (ता. जत) येथील तलाव पाच वर्षांनंतर भरले आहे. तलाव २००९ मध्ये आॅक्टोबर महिन्यामध्ये भरले होते. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर्व भागातील दरीबडची, सिध्दनाथ, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच सिध्दनाथ, दरीबडची, जालिहाळ खुर्द या तीन गावांतील शेतीला पाणीपुरवठा होणार आहे.
पूर्व भागातील सिध्दनाथ येथील लघु पाटबंधारे तलाव १९७२ मध्ये बांधण्यात आला आहे. तलावाची साठवण क्षमता १०२.७३ द.ल.घ.फू.आहे. तलावापासून आठ कि. मी. लांबीचा कालवा खोदण्यात आला आहे. तलावापासून दोन कि. मी. कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. कालव्याच्या सहाय्याने सिध्दनाथ जालिहाळ खुर्द, दरीबडची या तीन गावातील जमीन ओलिताखाली येते. पाणी व्यवस्थापन विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून केले जाते. या पाण्यामुळे ८३० हेक्टर जमीन ओलिताखाली येते.
सध्या तलाव भरून सांडव्यातून पाणी वाहून जात आहे. तलाव भरल्याने बोर ओढ्यावरील जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, खंडनाळ या गावांना त्याचा फायदा होतो. तलावामुळे परिसरातील भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. तलाव परिसर क्षेत्रामध्ये द्राक्षे, डाळिंब, फळबागांचे प्रमाण अधिक आहे.
कूपनलिका, विहिरींना पाणी पातळी वाढते. तलावात सिध्दनाथ गावची भारत निर्माण योजनेची विंधन विहीर व दरीबडची जलस्वराज्य योजनांची विंधन विहीर खोदण्यात आली आहे. सध्या तलाव भरल्याने दोन्ही गावांचा पाणीप्रश्न वर्षभराचा मिटला आहे. तसेच तलाव भरल्यामुळे बोर नदीच्या ओढा पात्रात
जानेवारी महिन्यापर्यंत पाणी
राहणार आहे. जनावरांच्या पाण्याचा विशेषत: शेळ््या-मेंढ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. (वार्ताहर)