पोलीस अधिकाऱ्यांचा खांदेपालट; गुन्ह्यांचे प्रमाण घटणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:55+5:302021-08-29T04:25:55+5:30
सांगली : बऱ्याच कालावधीपासून चर्चा असलेल्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली. अद्यापही काहींना ‘प्रभारी’ ठेवण्यात आले ...

पोलीस अधिकाऱ्यांचा खांदेपालट; गुन्ह्यांचे प्रमाण घटणार काय?
सांगली : बऱ्याच कालावधीपासून चर्चा असलेल्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली. अद्यापही काहींना ‘प्रभारी’ ठेवण्यात आले असले तरी, नव्या ठाणेदारांना गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान मात्र असणार आहे. शहरात वाढत असलेल्या चेन स्नॅचिंग, मोबाइल चोरी व दुचाकी लांबविण्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आता नवीन अधिकाऱ्यांना ॲक्शन मोडवर येऊनच काम करावे लागणार आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पोलीस दलास अधिक चांगल्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कामात हुरूप जाणवत आहे. अशातच प्रशासकीय बदल्यांची अनेक दिवसांपासून रखडलेली प्रक्रियाही त्यांनी पूर्ण करत शहरातील चारपैकी तीन ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विश्रामबाग, संजयनगर आणि सांगली ग्रामीणला नवीन अधिकारी देतानाच त्यांचे ‘मेरीट’ तपासूनच या नियुक्त्या देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, अशावेळी शहरात वाढतच चाललेल्या गुन्ह्यांंना राेखण्यासाठी आता या नवीन अधिकाऱ्यांना आक्रमक व्हावे लागणार आहे.
शहरातील विविध उपनगरांत घरात घुसून मोबाइल चोरीचे प्रकार तर रोजच घडत आहेत. यात लहान मुलांचा वापर करून चोरी करण्यात येत असल्याने ‘ज्युवेनल’मुळे पोलिसांना कारवाईतही अडचणी येत असल्या तरी मोबाइल चोरीचे मूळ शोधणे आवश्यक बनले आहे. मोबाइल चोरीप्रमाणेच शहरातील कोणत्याही भागात पार्क केलेली दुचाकी सध्या सुरक्षित नाही. ठरावीक कंपनीच्या आणि लॉक तोडण्यास सोप्या असलेल्या दुचाकींची तर हमखास चोरी होत आहे. यापूर्वी केवळ शासकीय रुग्णालयासह गजबजलेल्या भागात चोरी हाेत होती. आता घरासमोर लावलेली गाडीही चोरी होत आहे.
‘धूम’ स्टाईलने भरधाव वेगाने येऊन दागिने पळविण्याचेही प्रकार वाढल्याने आता शहरातील सर्वच ठाणेदारांनी वाढत्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
चेन स्नॅचिंग ते आता थेट लूटमार
शहरात सोनसाखळी पळविण्याचे प्रकार होतच होते. मात्र आता या महिनाभरात अगदी सायंकाळी सात वाजता दुचाकीस्वारांना अडवून लुटण्याचेही प्रकार घडले आहेत. यातील संशयितांना अटक झाली असली तरी अन्य संशयित अद्यापही बाहेरच असल्याने आता नवीन अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे.