शिराळा उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:33+5:302021-04-02T04:27:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. डी. बी. बोरसे यांनी भेट देऊन झाडाझडती ...

शिराळा उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. डी. बी. बोरसे यांनी भेट देऊन झाडाझडती घेतली. अधिकारी, कर्मचारी तसेच शस्त्रक्रिया विभागाबाबत कमतरतेचा आढावा घेऊन ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या रक्त साठवण केंद्र, निवासस्थानकांची स्थिती, शस्त्रक्रिया याबाबत खुलासा देण्याचा आदेश दिला.
उपसंचालक डॉ. बोरसे यांनी कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय तसेच शिराळा उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी लसीकरण तसेच कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन उपलब्धता, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपलब्धतेची माहिती घेतली. यावेळी शस्त्रक्रिया न होणे, रक्त साठवण केंद्र, निवासस्थाने याबाबत प्रसिद्ध झालेल्या ‘लोकमत’च्या बातम्यांचा उल्लेख करून याचा खुलासा करण्याचे आदेश दिले. जादा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जागा भरण्यासाठी पाठपुरावा करा, असेही सांगितले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. मोमीन यांनी माहिती दिली. शस्त्रक्रिया विभागात टेबल तसेच लागणारे साहित्य नाही, त्यामुळे शस्त्रक्रिया होत नाहीत, येथील कोणतेही अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी नाहीत किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून कोणीही इथे प्रतिनियुक्तीवर आलेले नाही, असे डॉ. मोमीन यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचारी उपलब्धता, तसेच वीज बिलाबाबत जादा निधी मिळावा, अशी मागणी केली.
यावेळी डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. अमित पाटील, डॉ. मनोज महिंद, डॉ. योगिता माने उपस्थित होते.
चौकट
कोरोना नसणाऱ्यांवर कोठे उपचार करणार?
उपजिल्हा रुग्णालय आता कोविड रुग्णालय झाल्याने तसेच जुन्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने कोरोना नसणाऱ्या रुग्णांवर कोठे उपचार करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.