श्री चौंडेश्वरीदेवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:17+5:302021-01-21T04:24:17+5:30
आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव २१ ते २८ जानेवारीदरम्यान होणार होता. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ...

श्री चौंडेश्वरीदेवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव रद्द
आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव २१ ते २८ जानेवारीदरम्यान होणार होता. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती शाकंभरी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवी आष्टा व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीचे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हेमाडपंती भव्य मंदिर आहे. देवीची करारी रूपातील मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. देवीचा भावई उत्सव परंपरागत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यावेळी बारा बलुतेदार खेळगडी मानकरी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. त्याचप्रमाणे श्री चौंडेश्वरी देवीचा वज्रलेप विधी झाल्यानंतर प्रतिवर्षी शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी कोरोना संकटामुळे भावई उत्सव रद्द करण्यात आला होता. त्याचप्रमाणे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून शाकंभरी नवरात्र महोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा अभिषेक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मात्र, यासाठी भाविकांनी गर्दी करु नये कोणतीही देणगी स्वीकारली जाणार नाही, असे आवाहन शाकंभरी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवानंतर होणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्या घरी समितीच्या वतीने लाडूचा प्रसाद पोहोच करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
फोटो - २००१२०२१-आयएसएलएम-आष्टा चौंडेश्वरी न्यूज