निर्यातीच्या गोडव्याने होणार हंगामाचा श्रीगणेशा
By Admin | Updated: October 6, 2015 23:47 IST2015-10-06T23:09:32+5:302015-10-06T23:47:29+5:30
जिल्ह्यातून १३.२७ लाख क्विंटल साखर जाणार : कारखान्यांना केंद्र, राज्याकडून क्विंटलला ५०० रुपये अनुदान

निर्यातीच्या गोडव्याने होणार हंगामाचा श्रीगणेशा
अशोक डोंबाळे -सांगली---साखरेच्या गडगडणाऱ्या दरामुळे साखर उद्योग सध्या गॅसवर आहे. या उद्योगाला दिलासा देण्यासाठी १५ टक्के साखर निर्यातीचा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाने घेतला आहे. निर्यात साखरेला प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातून आठ दिवसांत १३ लाख २७ हजार ५७३ क्विंटल साखर निर्यात होणार आहे. यामुळे निर्यातीच्या गोडव्याने यावर्षीच्या गळीत हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या वर्षामध्ये ७७ लाख ४३ हजार ४३२ टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर तयार झाली होती. मागील गळीत हंगामाचीही साखर शिल्लक राहिल्यामुळे जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखरसाठा कारखान्यांकडे शिल्लक आहे. शिवाय, २०१५-१६ चा गळीत हंगामही १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, कारखान्यांसमोर साखर ठेवण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण, सध्याही साखरेचे दर फारसे वाढले नसल्यामुळे कारखान्यांनी विक्री थांबविली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साखरेचे दर पुन्हा उतरतील, अशी भीती कारखान्यांना आहे. हा धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येक कारखान्यांना पत्रव्यवहार करून १५ टक्के साखर निर्यात करण्याची सूचना दिली आहे. या निर्यातीवर साखरेला प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी निर्यातीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातून सुमारे १३ लाख २७ हजार ५७३ क्विंटल साखर निर्यात होणार आहे. निर्यात वाढली, तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. दर वाढले तर अर्थातच कारखान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
शासनाकडून १५ टक्के साखर निर्यात करण्याचे पत्र आमच्या कारखान्याकडे आले आहे. त्यानुसार आम्ही दीड ते दोन लाख क्विंटल साखर निर्यात करणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल निर्यातीसाठी कारखान्यास ५०० ते ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. शासनाने कायमस्वरूपी असेच धोरण ठेवल्यास निश्चितच साखर उद्योगाला चांगले दिवस येतील.
- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल.
खासगी कारखानदार चिंतेत
केंद्र आणि राज्य शासनाने अडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्यासाठी प्रति क्विंटल साखरेला कर्जाची हमी घेऊन व्याज सवलत दिली आहे. परंतु, या अनुदानाचा फायदा केवळ सहकारी कारखान्यांनाच होणार आहे. खासगी साखर कारखान्यांना शासनाने कोणतीही सवलत दिली नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. आता शासनाने निर्यात साखरेलाही प्रति क्विंटल साखरेला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचाही आपणास फायदा होणार नसल्याचे दिसत आहे. यामुळे खासगी साखर कारखानदार अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यातून निर्यात होणारी साखर
कारखाना निर्यात साखर
वसंतदादा ५६९२५
राजारामबापू (साखराळे)१७६१००
विश्वास ९२१००
हुतात्मा १२४०६५
माणगंगा २८०१२
महांकाली ४९५६०
राजारामबापू (वाटेगाव)९३०३०
सोनहिरा १४०६७०
क्रांती १६१४७५
कारखाना निर्यात साखर
सर्वोदय ८५३७१
मोहनराव शिंदे ८४२५५
डफळे ६८२८०
यशवंत (गणपती संघ)२७०४७
केन अॅग्रो ८५८७०
उदगिरी शुगर ७९७०७
सदगुरू श्री श्री शुगर८६७०६
एकूण १३२७५७३
(साखर क्विंटलमध्ये )