हात दाखवा, रिक्षा थांबवा, कोरोनाची लस घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:36+5:302021-09-16T04:32:36+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात महालसीकरण अभियानाला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शामरावनगर परिसरात नगरसेवक अभिजित भोसले यांनी लसीकरणासाठी अभिनव उपक्रम ...

हात दाखवा, रिक्षा थांबवा, कोरोनाची लस घ्या
सांगली : महापालिका क्षेत्रात महालसीकरण अभियानाला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शामरावनगर परिसरात नगरसेवक अभिजित भोसले यांनी लसीकरणासाठी अभिनव उपक्रम राबविला. १५ रिक्षांद्वारे त्यांनी थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून लस दिली. हात दाखवा, रिक्षा थांबवा आणि कोरोनाची लस घ्या असे आवाहन करीत प्रभागात दिवसभर रिक्षा फिरत होत्या.
महापालिका क्षेत्रात बुधवारी ५० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारीही केली होती. शहरात १९४ लसीकरण केंद्र उभारण्यात आली होती. या केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती. लसीकरण अभियनात सर्वाधिक चर्चा झाली ती शामरावनगरची. या परिसरात थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन लसीकरण करण्यात आले. नगरसेवक अभिजित भोसले यांनी त्यासाठी १५ रिक्षांचे नियोजन केले होते.
प्रभागातील ४०० घरामागे एक रिक्षा होती. रिक्षात एक लसटोचक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व आशा वर्कर्स असे तीन होते. घरातील प्रत्येकांनी लस घेतली आहे का? घेतली नसेल तर कारण काय? अशी विचारणा केली जात होती. आशा वर्कर्सकडून त्यांचे प्रबोधन करून लसी घेण्यासाठी उद्युक्तही केले जात होते. हात दाखवा, रिक्षा थांबवा व कोरोना प्रतिबंधक लस घ्या, असा अभिनव उपक्रम प्रभागात राबविण्यात आला. याशिवाय आरोग्य केंद्रातही लसीकरणाची सोय करण्यात आली होती. या उपक्रमाचा प्रारंभ काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्याहस्ते झाले. आयुक्त नितीन कापडणीस यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.