सभासदांच्या हिताचा ठराव केल्याचे दाखवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:09+5:302021-09-18T04:29:09+5:30
सांगली : शिक्षक बँकेतील सत्तेचा वापर समितीच्या नेत्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी केला. त्यांनी सभासदांच्या हिताचा ठराव केल्याचे दाखवून द्यावे, असे ...

सभासदांच्या हिताचा ठराव केल्याचे दाखवून द्या
सांगली : शिक्षक बँकेतील सत्तेचा वापर समितीच्या नेत्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी केला. त्यांनी सभासदांच्या हिताचा ठराव केल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान विरोधी शिक्षक संघाच्या संचालकांनी शुक्रवारी दिले. बँकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एनपीएची तरतूद न करता नफा वाढवून दाखविला आहे. तो बोगस असल्याची टीकाही त्यांनी केली.
शिक्षक संघाचे संचालक विनायक शिंदे, अविनाश गुरव, अरुण पाटील, धनजंय नरुले यांनी पत्रकार बैठकीत भूमिका मांडली. शिंदे म्हणाले की, बँकेला एनपीएपोटी ८ कोटी ४४ लाख रुपये तरतूद करावी लागणार आहे. त्यापैकी ५ कोटी ७८ लाख रुपये शिल्लक आहेत. उर्वरित २ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. बँकेला ३ कोटी ३३ लाख रुपये नफा झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यातून एनपीएची रक्कम वजा जाता बँकेला केवळ ७० ते ७४ लाख रुपयेच नफा झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी बोगस नफा दाखविला आहे.
गुरव म्हणाले की, सातारा व कोल्हापूर येथील शिक्षक बँकेने गतवर्षीच्या लाभांश रकमेचा सभासदांना लाभ दिला आहे. सांगलीच्या बँकेने लाभांश रकमेचा एनपीएत समावेश केला असता तर पुढील वर्षीच्या नफ्यातून सभासदांना अधिकचा लाभांश मिळाला असता. बक्षीस पगारापोटी ६२ लाखांची रक्कम राखीव ठेवली आहे. त्यावर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा आरोप केला.
या वेळी सुधाकर पाटील, महादेव हेगडे, शोभा पाटील, पोपटराव सूर्यवंशी, शशिकांत माणगावे, संजय दिवे, आरिफ मुजावर उपस्थित होते.