शिराळा, कोकरूड रुग्णालयाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST2021-06-03T04:20:02+5:302021-06-03T04:20:02+5:30

शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. मोमीन व ग्रामीण रुग्णालय, कोकरूडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सलमा ...

Show cause notice to the Superintendent of Shirala, Kokrud Hospital | शिराळा, कोकरूड रुग्णालयाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

शिराळा, कोकरूड रुग्णालयाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. मोमीन व ग्रामीण रुग्णालय, कोकरूडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सलमा इनामदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पलूसचे डॉ. आदिक पाटील यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे.

या दोन्ही रुग्णालयांच्या अधीक्षकांच्या कामाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिला होता. त्यानंतर प्राप्त अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांना सर्व औषधे उपलब्ध असतानाही बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी देण्याचे प्रकार घडले होते. येथील मृत्यूदरही जास्त आहे. कोकरूड ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची पहिली लाट झाल्यानंतर अडीच महिन्यात कोणत्याही आजाराचा एकही रुग्ण तपासण्यात आला नाही. कामात कुचराई होत असल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. याबाबत तहसीलदार कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दोन्ही रुग्णालयांच्या अधीक्षकांना खडे बोल सुनावले होते. दोन्ही ठिकाणच्या कामाच्या चौकशीचे आदेशही दिले होते.

यावर तातडीने त्याचदिवशी रात्री उशिरापर्यंत सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी तपासणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोमीन यांच्याकडून कार्यभार काढून घेऊन पलूसचे डॉ. आदिक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. मोमीन व डॉ. सलमा इनामदार यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

जिल्हाधिकारी चौधरी यांनी केलेल्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालयातील मृत्यूदर कमी करणे, दोन्ही रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी करणे यावर तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांच्या देखरेखीखाली काम सुरू झाले आहे.

कोट

पलूस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आदिक पाटील यांच्याकडे शिराळा उपजिल्हा रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच डॉ. जे. के. मोमीन व डॉ. सलमा इनामदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

- डॉ. संजय पाटील, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Show cause notice to the Superintendent of Shirala, Kokrud Hospital