बहारदार लावण्यांवर सखींचा जल्लोष
By Admin | Updated: March 8, 2015 00:20 IST2015-03-08T00:20:30+5:302015-03-08T00:20:52+5:30
चैत्रालीचा नाद करायचा नाय : नृत्यांगनांच्या अदाकारीला टाळ्या, शिट्ट्यांनी दाद...

बहारदार लावण्यांवर सखींचा जल्लोष
सांगली : धुळवडीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सादर झालेल्या एकापेक्षा एक बहारदार लावण्या... त्याला मिळालेली ढोलकीची आणि घुंगराची साथ... व्यासपीठावर नर्तकींची थिरकणारी पावले... आणि टाळ्या, शिट्टयांचा जल्लोष अशा वातावरणात शुक्रवारी ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय’ या लावणी कार्यक्रमात सखींनी अक्षरश: तीन तास धम्माल केली.
‘लोकमत’ सखी मंच व संजयकाका युवा प्रतिष्ठानचे अरविंदभाऊ गोविंद तांबवेकर यांच्या संयुक्त विद्यमाने सखी सदस्यांसाठी हेरंब लॉन येथे ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय’ या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाची वेळ असली तरीही दुपारी २ वाजल्यापासून सखींनी कार्यक्रमस्थळी रांगा लावल्या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर कमिटी मेंबर्स यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये मीनल कुडाळकर, माया शितोळे, रेखा सरनोबत, गीतांजली उपाध्ये, शोभा कुलकर्णी, शांता खेमलापुरे, सुजाता पाटील, जया जोशी, अलका पाटील, अवंतिका शिंदे, वैशाली खटके, निलकमल डागा, संगीता हारगे, गीतांजली देसाई, उषा जाधव, सविता कोरे, सीमा लाड, शीला पाटील, सुनीता शेरीकर, शिल्पा शिरगावकर, मालती घोडके, भाग्यश्री कवठेकर, रेखा पाचोरे, सुनीता रुपनूर, चंदन विचारे, पद्मा म्हस्के, जयश्री कुरणे, तनुजा शेख, रागिणी सायगाव आदींचा समावेश होता. कार्यक्रम सुरू होऊनही अद्याप चैत्रालीचे रंगमंचावर आगमन न झाल्याने सर्वांनाच चैत्रालीची प्रतीक्षा होती. साजशृंगार करुन नटलेल्या लावण्यवतींनी प्रथम रसिकप्रेक्षकांना मानाचा मुजरा केला. चैत्रालीराजे यांचे रंगमंचावर आगमन होताच सखींनी एकच जल्लोष केला व टाळ्यांच्या कडकडाटात, शिट्ट्यांच्या आवाजात व हात उंचावून त्यांचे स्वागत केले. चैत्रालीराजे यांनी त्यांच्या हळूवार, मोहक अदांनी सखींना घायाळ केले. त्यांच्या लावण्यांना सखींनी शिट्ट्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली. लावणी नृत्याने सारे वातावरण शृंगाररसाने भारुन गेले होते. तीन तास कसे गेले हे सखींनाच कळले नाही. राजकुमार मगदूम यांनी कार्यक्रमाचे रंगतदार शैलीत निवेदन करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
ठसकेबाज लावण्या...
कार्यक्रमात लावण्यवतींनी कलामंचावर ठसकेबाज लावण्या सादर करुन सखींची मने जिंकली. प्रत्येक लावणीला सखींनी टाळ्या आणि शिट्टया वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तमाशाच्या फडात फेटे हवेत फेकले जायचे, परंतु या कार्यक्रमात सखींनी फेटे परिधान केले होते. लावणीच्या ठेक्यावर सखींनी हातातील रुमाल व फेटे हवेत फेकून नृत्यांगनांना दाद दिली.
दुपारी ६ ते ८ या कालावधित झालेल्या कार्यक्रमात तीन हजारहून अधिक सखी सदस्यांनी लावणीचा आस्वाद घेतला.
बुगडी शोधायला डोकं.... नाद खुळा.... शिट्टी वाजली.... पाडाला पिकलाय आंबा.... भिंगरी ग भिंगरी.... ही पोरगी साजूक तुपातली...... अशा एकापेक्षा एक लावणी नृत्यांनी सखींना भान विसरुन ठेका धरायला भाग पाडले तसेच कित्येक सखींनी नृत्य करुन लावणींना दाद दिली.
वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा गौरव
जिल्ह्यातील सतरा वृत्तपत्रविक्रेत्या महिलांचा ‘लोकमत’कडून खास सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांचे स्नेहबंध दृढ व्हावेत, यासाठी ‘लोकमत’तर्फे तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे सहलीचे आयोजन केले होते.
लकी ड्रॉ विजेत्या
उपस्थित सखी सदस्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्या ठरलेल्या आरती पवार, प्रियांका गवळी, सुवर्णा गायकवाड, गीता बेडगे, छाया गुरव, प्रबोधिनी देसाई, रेश्मा मुलाणी, वर्षा शेलार, लता शिंदे यांचा सत्कार केला.
गोव्यातील वास्को पालिकेच्या अधिकारी मंगला कोरगावकर यांनी लावण्यांना दाद देत बिदागीसाठी रोख ५००० रुपयांची रक्कम चैत्राली यांच्याकडे सुपूर्द केली.