महापालिकेत पदांच्या पालख्या आयारामांच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:31+5:302021-02-06T04:48:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या अडीच वर्षांत एखाददुसरे पद वगळता महत्त्वाच्या पदांवर निष्ठावंताऐवजी आयारामांनाच ...

महापालिकेत पदांच्या पालख्या आयारामांच्या खांद्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या अडीच वर्षांत एखाददुसरे पद वगळता महत्त्वाच्या पदांवर निष्ठावंताऐवजी आयारामांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापौर, उपमहापौर निवडीत तरी निष्ठावंतांना न्याय दिला जाणार की, पुन्हा पदाच्या पालख्या पक्षात नव्याने आलेल्यांच्या खांद्यांवर सोपविल्या जाणार, याची चर्चा सुरू आहे. त्यातून भाजपअंतर्गत जुना-नवा वाद उफाळण्याची शक्यताही आहे.
काँग्रेसची ४० वर्षांची सत्ता हिरावून घेण्यासाठी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अनेक राजकीय तडजोडी केल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विविध आरोपांनी घेरलेल्या नगरसेवकांनाही पावन करून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्याचा निश्चितच फायदा भाजपलाही झाला. दोन्ही काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांमुळे भाजपला महापालिकेच्या सत्तेची दारेही खुली झाली. परिणामी, गेल्या अडीच वर्षांत याच नेत्यांचा भाजपच्या नेतृत्वावर आणि महापालिकेतील कारभारावर वरचष्मा राहिला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांच्या दबावाखालीच सध्या भाजपची नेतेमंडळी काम करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या अडीच वर्षांत आयारामावर भाजपची भिस्त राहिली आहे. त्यामुळे पक्षाशी निष्ठावंत असलेल्या नगरसेवकांना न्याय देण्यात भाजपचे नेतृत्व कमी पडल्याची भावनाही वाढली आहे. आतापर्यंत महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांवर काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्यांनाच संधी देण्यात आली आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्याही याच नेत्यांच्या ताब्यात राहिल्या आहेत. अपवाद केवळ विद्यमान सभापती पांडुरंग कोरे यांचा. याशिवाय प्रभाग सभापती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती अशा विषय समितींवर आयारामांचेच वर्चस्व राहिले आहे. स्थायी समितींच्या नऊ सदस्यांतही बाहेरून आलेल्यांना अधिक संधी मिळाली आहे. तसे पाहिले तर भाजपच्या ४३ नगरसेवकांत निष्ठावंतांची संख्या फारशी नाही. निवडणुकीवेळी सत्ता मिळविण्यासाठी पक्षात नव्याने आलेल्यांनाच उमेदवारी देण्यात आली. तर, निष्ठावंतांना केवळ सतरंज्या उचलण्याचे काम देण्यात आले. आता पुढील अडीच वर्षे महापौरपद खुले आहे. या पदासाठी तरी निष्ठावंतांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. भाजपकडून नेहमीच सामान्यांना न्याय दिला जात असल्याचे सांगितले जाते. पण, महापालिकेच्या सत्ताकारणात नेत्यांनी या तत्त्वालाच बगल दिल्याचे दिसून येते.
चौकट
नव्यांची डोकेदुखी वाढली
भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य आता पक्षनेतृत्वासाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. या सदस्यांना भाजपमध्ये प्रवेश करताना नेत्यांनी पदाची आमिषे दाखविली होती. पण, आता त्याची पूर्तता होत नसल्याने हे सदस्य अस्वस्थ आहेत. काहींनी तर थेट नेतृत्वावर उघडउघड टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या महापौरनिवडीत ही डोकेदुखी आणखी वाढणार नाही, याची दक्षता भाजप नेत्यांना घ्यावी लागणार आहे.