मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:07+5:302021-09-02T04:55:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणाऱ्या मंदिरांची दारे खुली करण्याची मागणी केली जात आहेत. काही ...

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते ?
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणाऱ्या मंदिरांची दारे खुली करण्याची मागणी केली जात आहेत. काही मंदिरांचे विश्वस्त, मंदिरांबाहेर विक्रेते, मंदिरातील कर्मचारी, पुजारी यांनाही मंदिरे बंदचा मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत प्रत्येक राजकीय पक्षाने याविषयीची वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दीड वर्षात बहुतांश काळ बंद राहिले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्व घटक सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. महापुरातही मंदिरांबाहेरील दुकानांचे नुकसान झाले. अशा विविध संकटांचा सामना कराव्या लागणाऱ्या देवाच्या दारातल्या माणसांना आता मंदिरे उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. दुसरीकडे या विषयावर राजकारणही सुरू झाले आहे. भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने शासनाचा निर्णय योग्य असल्याबाबत मत मांडले आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
चौकट
१० कोटींची उलाढाल ठप्प
सांगली शहरात ७ मोठी मंदिरे आहेत. याठिकाणी महिन्याला अडीच कोटी रुपयांची उलाढाल होते.
गेल्या चार महिन्यांत जवळपास १० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
सण, जयंती, नवमी, संकष्टी अशावेळी ही उलाढाल नेहमीच्या उलाढालीपेक्षा दुप्पट असते. परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची संख्याही अधिक आहे.
चौकट
भाविकांच्या जिवाचीच आम्हाला काळजी : शिवसेना
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले की, शिवसेना हा हिंदुत्ववादीच पक्ष आहे. त्यामुळे मंदिरांविषयीचे आमचे प्रेम भाजपने सांगण्याची आवश्यकता नाही. भाविकांच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणून मंदिरे बंद आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणेच राज्य शासन निर्णय घेत आहे.
चौकट
मंदिरे लवकरच खुली होतील : काँग्रेस
कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याने आता मंदिरांबाबत लवकरच अपेक्षित निर्णय होणार आहे. याची कल्पना असल्याने भाजपने श्रेय लाटण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे, असे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.
चौकट
कोरोना वाढला तर हेच लोक दोष देतील : राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेची शक्यता आता वर्तविली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळली पाहिजे. मंदिरे सुरू केल्यानंतर जर कोरोना वाढला, तर हेच लोक शासनाला दोष देतील. सध्या राज्य शासन केंद्र शासनाच्याच सूचनांचे पालन करीत आहे.
चौकट
मंदिरे कोणत्याही परिस्थितीत उघडावीत : भाजप
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले की, गर्दीची अन्य ठिकाणे सुरू असताना मंदिरांवरच निर्बंध लादले आहेत. यावर अवलंबून असणाऱ्या घटकांची काळजी सरकारला वाटायला हवी.
चौकट
विश्वस्त म्हणतात
मंदिरांचे नुकसान होत आहे, ही गोष्ट खरी आहे. त्याचबरोबर भाविकांच्या जिवाचीही काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे शासन योग्य निर्णय घेते. त्याला सहकार्य करणे आवश्यक आहे.
-अमोल गिरी, पंचमुखी मारुती मंदिर
कोट
हॉटेल्स, उद्योग, व्यवसाय, वाहतूक सर्व काही सुरू असताना मंदिरांसाठीच निर्बंध कशासाठी? मंदिरे खुली केल्यानंतर कोरोना वाढणार नाही. नियमांचे पालन करून मंदिरे व्यवस्थापन करतील. त्यामुळे मंदिरे उघडायला हवीत.
-श्याम तोष्णीवाल, व्यंकटेश मंदिर, लाले प्लॉट