महापालिकेकडुन रस्ता खोदाईच्या भरपाई आकारणीत काेट्यवधीचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:13+5:302021-07-05T04:17:13+5:30
कुपवाड : महापालिका हद्दीमध्ये भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड, मुंबई या कंपनीने रस्ता खोदाई केली होती. या रस्ता खोदाईसाठीच्या नुकसान ...

महापालिकेकडुन रस्ता खोदाईच्या भरपाई आकारणीत काेट्यवधीचा घोटाळा
कुपवाड : महापालिका हद्दीमध्ये भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड, मुंबई या कंपनीने रस्ता खोदाई केली होती. या रस्ता खोदाईसाठीच्या नुकसान भरपाई आकारणीत महापालिका प्रशासनाने कोट्यवधीचा घोटाळा केल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे शासनाने संबंधित महापालिका अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती कुपवाड शहर शिवसेनेचे प्रमुख रुपेश उर्फ भालचंद्र मोकाशी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मोकाशी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबईतील भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात गॅस लाईन टाकण्यासाठी रस्ता खुदाई केली होती. महापालिका हद्दीमध्ये रस्ता खुदाई केल्यानंतर त्यांची पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका बांधकाम विभागाने भरपाई रक्कम आकारणी केली आहे. त्या रकमेत फार मोठी तफावत असल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.
सांगली महापालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्ता खोदाईची भरपाई रक्कम भरून घेताना रितसर शासन निर्णयानुसार २४ कोटी रुपये आकारणी करण्याऐवजी फक्त आठ कोटी रुपये भरून घेण्यात आले असल्याचे मोकाशी यांनी सांगितले आहे. रस्ता खोदाईत ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे. त्या अधिकाऱ्यांची शासनाने सखोल चौकशी करावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नानासाहेब शिंदे, रूपेश मोकाशी, महेंद्र चंडाळे, हरिभाऊ लेंगरे, सुरेश साखळकर, विठ्ठल संकपाळ, संतोष पाटील उपस्थित होते.