अडीच महिन्यांनी दुकाने उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:55+5:302021-06-16T04:34:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अडीच महिन्यांच्या लाॅकडाऊननंतर सोमवारी शहरातील सर्वच व्यवहार अनलाॅक झाले. सकाळपासून नागरिक, वाहनांच्या गर्दीने रस्ते, ...

The shops opened after two and a half months | अडीच महिन्यांनी दुकाने उघडली

अडीच महिन्यांनी दुकाने उघडली

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अडीच महिन्यांच्या लाॅकडाऊननंतर सोमवारी शहरातील सर्वच व्यवहार अनलाॅक झाले. सकाळपासून नागरिक, वाहनांच्या गर्दीने रस्ते, मुख्य बाजारपेठ फुलून गेली होती. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होते. हरभट रोड, मारुती रोडवर तर वाहतुकीची कोंडी झाली होती. परंतु दुकानात आणि दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगला मात्र हरताळ फासला गेला होता. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढता एप्रिल महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापासून कडक लाॅकडाऊन करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले होते. पण या निर्बंधांना नागरिकांनी हरताळ फासला होता. रुग्णांची संख्या दीड हजाराच्या पुढे जाताच केवळ वैद्यकीय सेवा, औषध दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. ऑक्सिजन बेडची उपलब्धताही शासकीय निकषानुसार होती. त्यामुळे बाजारपेठा खुल्या करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत होती. शासनानेही चौथ्या स्तरातून सांगली जिल्ह्याच्या समावेश तिसऱ्या स्तरात केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनानेही सोमवारपासून सर्वच व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. या निर्णयाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले.

सोमवारी सकाळी ७ वाजताच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली. दुकानाची स्वच्छता करून ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. रस्त्यावर सकाळपासून भाजी विक्रेत्यांनीही ठाण मांडले होते. हातगाड्यावाल्यांनी रस्ते फुलले होते. सकाळी दहानंतर मात्र रस्ते गर्दीने फुलून गेले. मुख्य बाजारपेठ असलेल्या हरभट रोड, मारुती रोड, मेन रोड, कापडपेठेत दिवसभर ग्राहकांची रेलचेल होती. कपडे, काॅस्मेटिक, चप्पल विक्रीच्या दुकानात ग्राहक मोठ्या संख्येने दिसत होते. रेनकोड, छत्री खरेदीकडेही ग्राहकांचा कल होता. त्या मानाने सराफ पेठेत ग्राहकांची संख्या कमी होती. सोमवारी सराफ पेठ बंद असते. त्यामुळे ग्राहक कमी आले असावेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तरीही काही मोठ्या दुकानात मात्र सोने-खरेदीसाठी गर्दी दिसत होती. गणपती पेठेत वाहतुकीची कोंडी झाली होती. हरभट रोड, मारुती चौकातही गर्दीमुळे वाहतूक काही काळ ठप्प होती. बँका, एटीएमसमोरही काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या.

चौकट

कोरोना नियमांचे काय?

प्रशासनाने व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण या नियमांचे कुठेच पालन होताना दिसत नव्हते. दुकानासमोर सहा फुटांच्या अंतराने मार्किंग गायब होते. एकाचवेळी दुकानात मर्यादेपेक्षा अधिक ग्राहक होते. अनेक जण मास्क, रुमालचाही वापर करीत नव्हते. पोलीस प्रशासन मात्र बाजारपेठेत फिरून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत होती.

चौकट

धोका अजून संपलेला नाही

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. दुकानदारांनीही मास्क, सोशल डिस्टन्सिंगसाठी ग्राहकाकडे आग्रह धरला पाहिजे. दुकानातील गर्दीही टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Web Title: The shops opened after two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.