दुकानांचे मालक आम्ही की शासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:14+5:302021-05-14T04:26:14+5:30
सांगली : कडक लॉकडाऊन करताना पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना शासनाने, प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. दुकानांचे मालक आम्ही आहोत की शासन, ...

दुकानांचे मालक आम्ही की शासन
सांगली : कडक लॉकडाऊन करताना पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना शासनाने, प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. दुकानांचे मालक आम्ही आहोत की शासन, असा संतप्त सवाल व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली आहे.
शहा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शासनाने आणखी लॉकडाऊन वाढविला. आमचीच दुकाने बंद ठेवताना आम्हालाच विश्वासात घेतले गेले नाही. नक्की या दुकानांचे मालक आम्हीच आहोत की आणखी कुणी आहे? हे तरी प्रशासनाने सांगावे म्हणजे आमची येणी-देणी, जबाबदाऱ्या यातून तरी आम्ही मोकळे होऊ.
कोरोनाची स्थिती आम्हास समजत नाही असे आहे का? व्यापारी सगळे जाणून आहेत. आमचे लोक मृत्युमुखी पडले आहेत, पण आता व्यवसाय यापेक्षा जास्त काळ बंद ठेवू शकत नाही. पुणे, मुंबई या महानगरांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी काही वेळ व्यापार करण्यास परवानगी दिली असताना सांगली जिल्ह्यातच पूर्ण व्यापार बंद ठेवण्याचे आदेश कशासाठी दिले जात आहेत. प्रशासनाचे आम्ही शत्रू आहोत का, असा सवाल आता आम्हाला पडत आहे.
कडक लॉकडाऊन जाहीर करायचे होते, तर ते पहिल्यापासून का केले नाही. आज प्रशासन व्यापाऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत आहे. गुन्हेगार असल्यासारखे वागवत आहे. रस्त्यावर अपमान करणे, मारणे, शर्टाला धरून ओढणे, अवास्तव दंड लावणे, अशा स्वरूपाची कारवाई केली जात आहे.
आम्हाला दंड लावून, काठीने मारून तरी तुम्हाला त्या वेदना समजल्या का? याप्रश्नी व्यापाऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. वेगळे वळण लागू नये यासाठी जिल्हाधिकारी यांना दि १५ मे रोजी सकाळी ११ वाजता आम्ही सर्व असोसिएशनचे अध्यक्ष भेटणार आहोत.
चौकट
लोकप्रतिनिधी काय करणार आहेत?
लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांना राज्य किंवा केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी काही करणार आहेत की नाही? सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन शहा यांनी केले आहे.