मिरजेत दुकान फोडून पाच लाख लंपास

By Admin | Updated: June 15, 2014 00:22 IST2014-06-15T00:17:32+5:302014-06-15T00:22:19+5:30

भरवस्तीतील घटना : पोलिसांना आव्हान

The shop is about five lakh lapsed | मिरजेत दुकान फोडून पाच लाख लंपास

मिरजेत दुकान फोडून पाच लाख लंपास

मिरज : येथील उदगाव वेस परिसरातील भरवस्तीतील दुकान फोडून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड लंपास केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. माहीतगार व्यक्तीनेच चोरी केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मिरजेतील उदगाव वेस येथील ज्ञानगिरी मठासमोर येथे प्रवीण अरुण टोमके यांचे ‘दत्त मंगल सेवा केंद्र’ हे दुकान आहे. कार्यक्रमांसाठी टेबल, खुर्च्या आदी साहित्य भाड्याने देण्याचा टोमके यांचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वत:च्या एमएच १० एएन ६२५५ क्रमांकाच्या मोटारीची कालच (शुक्रवारी) पाच लाख रुपयांना विक्री केली होती. गाडी विक्रीतून मिळालेले पाच लाख रुपये व स्वत:कडील ३५ हजारांची रक्कम त्यांनी दुकानातील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती. काल रात्री चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी काढून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून मुख्य भागात असलेल्या टेबलच्या ड्रॉव्हरमधील ५ लाख ३५ हजाराची रोकड लंपास केली. सकाळी टोमके यांनी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शहर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने दुकानामागील बोळातून एसटी बसस्थानकापुढील महात्मा फुले चौकापर्यंत माग काढला. मात्र त्या चौकात श्वान घुटमळले. ठसेतज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुुरू होते. (वार्ताहर)

 

Web Title: The shop is about five lakh lapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.