सांगली जिल्ह्यात मोठ्या गावांत नेत्यांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:27+5:302021-01-19T04:27:27+5:30
सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. ...

सांगली जिल्ह्यात मोठ्या गावांत नेत्यांना धक्का
सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडी असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथे त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे पानिपत झाले असून, तेथे चुलत मेहुण्याने भाजपची सत्ता आणली आहे.
मिरज तालुक्यातील कवलापूर आणि तुंग या मोठ्या गावांत राष्ट्रवादीची सत्ता आली, तर पूर्व भागातील मालगावात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. म्हैसाळ येथे जयंत पाटील यांचे सख्खे मेहुणे राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे यांच्या गटाची सत्ता उलथवून लावून चुलत मेहुणे तथा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी भाजपचा झेंडा रोवला.
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी तीन बिनविरोध झाल्या असून, तेथे राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील गटाची सत्ता आली आहे. तालुक्यातील एकूण २१ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले, तर खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आठ ग्रामपंचायती जिंकल्या. आठ गावांत संयुक्त पॅनलने यश मिळवले, तर दोन गावांत पक्षविरहित आघाड्या सत्तेवर आल्या. सावळज, येळावी येथे राष्ट्रवादीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. जत तालुक्यात २९ पैकी नऊ गावांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. ११ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने, तर ९ ठिकाणी भाजपने सत्तेचा दावा केला आहे. येथे काँग्रेसचे आ. विक्रमसिंह सावंत यांना मोठ्या गावांत धक्का बसला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीने सहा, भाजपने दोन, अजितराव घोरपडे गटाने दोन, तर राष्ट्रवादी आणि घोरपडे गटाने संयुक्तपणे दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आटपाडीत नऊपैकी दोन बिनविरोध झाल्या, तर चार शिवसेनेने आणि तीन भाजपने जिंकल्या. भाजपचे नेते, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख गटाला शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी धक्का दिला, तर खानापूर तालुक्यात १३ पैकी ११ गावांत आ. बाबर गटानेच बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते, माजी आ. सदाशिवराव पाटील गटाला तीन, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळाली.
कडेगाव तालुक्यांत सर्वच्या सर्व नऊ ग्रामपंचायती ताब्यात घेत काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख गटाचा धुव्वा उडवला. पलूस तालुक्यात १२ पैकी विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादीचे आ. अरुण लाड यांच्या संयुक्त आघाडीने पाच, कदम गटाने चार, तर स्थानिक आघाडीने तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.