शिवशाही बसेस सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:42+5:302021-09-06T04:29:42+5:30
शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने एस. टी. महामंडळाकडील बसेसची चाके पुन्हा महामार्गावर धावू ...

शिवशाही बसेस सुसाट
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने एस. टी. महामंडळाकडील बसेसची चाके पुन्हा महामार्गावर धावू लागली आहेत. सांगली आगारातून शिवशाही बसेसही सुसाट धावत आहेत. सध्या आठ बसेस सुरू असल्या तरी प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसेसची संख्या वाढवली जाणार आहे.
कोरोनामुळे एस. टी. महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. या संकटातून सावरत महामंडळाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह परजिल्हे, परराज्यातील सेवाही सुरू केल्या आहेत. प्रवाशांनी नेहमीच शिवशाहीला मोठा प्रतिसाद दिला आहे. सध्या सांगली - पुणे मार्गावरच शिवशाही धावत आहे. दिवसभरात आठ बसेस सोडल्या जात आहेत. प्रवाशांचा प्रतिसादही वाढला आहे. त्यामुळे या मार्गावर शिवशाही बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय सांगली आगाराने घेतला आहे.
चौकट
जिल्ह्यातील एकूण आगार : १०
सध्या सुरू असलेल्या शिवशाही : ८
एकूण शिवशाही : ३०
चौकट
पुणे मार्गावर सुरू आहे शिवशाही
सांगली आगारातून पुण्यासाठी शिवशाही बसची सेवा उपलब्ध आहे. विटा - मुंबई या मार्गावरही शिवशाही सुरू करण्यात आली होती. पण प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने ती बंद करण्यात आली.
चौकट
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
जिल्ह्यातील दहा आगारांत बसेसच्या सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक आगारासाठी स्प्रेपंप देण्यात आला आहे. बसचे निर्जंतुकीकरण करूनच पुढील प्रवासासाठी सोडली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी बसेसमध्ये अँटी मायक्रोबिअल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सांगलीच्या बसेसचेही कोटिंग केले जाणार आहे.
चौकट
प्रवाशांचा प्रतिसाद चांगला
सांगली - पुणे या मार्गावर शिवशाही बसेस धावत आहेत. त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या ५० टक्केपेक्षा अधिक प्रवासी आहेत. त्यामुळे आणखी २० शिवशाही बसेस सुरू करणार आहोत. या बसेसचे वेळापत्रकही निश्चित करण्याचे काम सुरू आहे. - अरुण वाघाटे, विभागीय नियंत्रक, सांगली.