शिवसंपर्क अभियानातून जनतेच्या अडीअडचणी सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:15+5:302021-07-14T04:31:15+5:30
इस्लामपूर येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, आनंदराव पवार, दि. बा. पाटील, नंदकुमार निळकंठ, सागर ...

शिवसंपर्क अभियानातून जनतेच्या अडीअडचणी सोडविणार
इस्लामपूर येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, आनंदराव पवार, दि. बा. पाटील, नंदकुमार निळकंठ, सागर मलगुंडे, शकील सय्यद, प्रतिभा शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शिवसेना नेहमीच जनतेबरोबर आहे. यापुढील काळातही जनतेसोबत राहील. २४ जुलैपर्यंत चालणाऱ्या शिवसंपर्क अभियानात पक्षाचे पदाधिकारी जनतेशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतील. पक्ष आणि शासनाच्या पातळीवर अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात वाळवा तालुक्यातील शिवसंपर्क अभियानातील बानुगडे-पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन झाल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, कादंबरीकार प्रा. दि. बा. पाटील, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार निळकंठ, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, जिल्हा संघटक, नगरसेविका प्रतिभा शिंदे, शहरप्रमुख नगरसेवक शकील सय्यद, सतीश पाटील, वर्षा निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वाडी-वस्तीवर पोहोचून जनतेशी संवाद साधणार आहोत. शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू. शिवसंपर्क अभियानात नवीन सभासद नोंदणी आणि गावोगावी शिवसेनेच्या शाखांची सुरुवात करू. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आहे. तसेच संपूर्ण जिल्हा भगवामय करण्याचे उद्दिष्ट आहे.
शकील सय्यद यांनी स्वागत केले. सागर मलगुंडे यांनी आभार मानले.