‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा’ची हुरहूर
By Admin | Updated: February 20, 2015 23:10 IST2015-02-20T22:46:28+5:302015-02-20T23:10:42+5:30
वितरण लांबणीवर : सांगलीतील मातब्बर शर्यतीत

‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा’ची हुरहूर
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा’चे वितरण जसजसे लांबणीवर जात आहे, तशी सांगलीकरांची हुरहूर आणि उत्सुकता वाढत आहे. १९ फेब्रुवारीस, शिवजयंतीदिनी राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण होणार, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र सरकारचे हे आश्वासन फोल ठरले. क्रीडा क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक करण्यासाठी राज्य शासन १९६९ पासून शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करते. एक लाख रुपये, ब्लेझर, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विजेत्यास महाराष्ट्रात विनामूल्य एसटी प्रवास सवलत आणि विविध लाभ मिळतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात या पुरस्काराचे वेगळेच ग्लॅमर आहे. क्रीडापंढरी सांगली जिल्ह्याच्या खात्यात आजवर वीसपेक्षा अधिक शिवछत्रपती पुरस्कारांची नोंद झाली आहे. २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षातील पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नाना सिंहासने, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्राचार्य एन. एम. भैरट, राष्ट्रीय खो-खोपटू युवराज जाधव, तलवारबाज अर्चना लाड, राष्ट्रीय कबड्डीपटू बच्चू हलवाई, रामभाऊ घोडके, राष्ट्रीय सायकलपटू हुसेन कोरबू, महिला कुस्तीगीर कौशल्या वाघ, रामचंद्र पवार आदींनी प्रस्ताव दाखल केले आहेत.
पुरस्कार निवडीसाठी गुणांकन पध्दतीचा अवलंब केला जातो. ‘पॉर्इंट’च्या शर्यतीत कोण पुढे कोण मागे हे तर पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच कळेल़ जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू, संघटक व प्रशिक्षकांमध्ये या मानाच्या पुरस्कारासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे़ पुरस्कार वितरणासाठी १९ फेब्रुवारीचा मुहूर्त हुकला़ आता मे महिन्यापर्यंत हा कार्यक्रम ढकलण्यात आला आहे़ पुरस्कार निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही, वितरणास विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.