शिवाजीराव नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळणार
By Admin | Updated: September 18, 2014 23:27 IST2014-09-18T22:53:25+5:302014-09-18T23:27:20+5:30
इस्लामपूर विधानसभा : काँग्रेसची स्वबळाची तयारी

शिवाजीराव नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळणार
अशोक पाटील -इस्लामपूर -काँग्रेस आघाडी व महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र इस्लामपुरात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे, तर शिराळ्यात माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. इस्लामपुरात शिवसेनेचा उमेदवार निश्चित नाही. शेवटच्या टप्प्यात तगड्या उमेदवारालाच शिवसेना तिकीट देईल, असे चित्र आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहे. यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधातील मतांची विभागणी होणार असल्याने महायुतीत अस्वस्थता आहे.
मागील निवडणुकीत शिराळ्यातून काँग्रेसकडून शिवाजीराव नाईक यांनी निवडणूक लढवली होती, परंतु काँग्रेसच्याच नेत्यांनी दिवसा हात आणि रात्री टीव्हीचा प्रचार केल्याने अपक्ष मानसिंगराव नाईक विजयी झाले होते. यावेळी मात्र चित्र उलटे आहे. ज्यांनी गतवेळी आघाडीचा धर्म पाळला नाही, तेच निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. यामुळे मानसिंगराव नाईक यांची गोची झाली. शेवटच्या टप्प्यात देशमुख गटाच्या सत्यजित देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेले दोन दिवस शिवाजीराव नाईक मुंबईत तळ ठोकून आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेतून दि. बा. पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी ही जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उतरणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते, मात्र ही जागा भाजपला जाणार असल्याचे दिसताच शेट्टी आणि नाईक यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून उमेदवारी निश्चित केल्याचे समजते.
इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून नानासाहेब महाडिक यांनी मोर्चेबांधणीस सुरु केली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याने महाडिक यांनी ‘मातोश्री’वर संपर्क ठेवला आहे, परंतु अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जि. प. सदस्य भीमराव माने हेही निवडणूक तयारीला लागले आहेत. अंतिम टप्प्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रतीक पाटलांची एन्ट्री
सांगलीतील काँग्रेसचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून जयंत पाटील यांच्या मतदारसंघात एन्ट्री करून काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतविभागणी होणार असल्याने सध्यातरी जयंत पाटील यांच्याविरोधातील मंडळी अस्वस्थ दिसत आहेत.