शिवाजीराव नाईक व माझ्यात स्पर्धा नाही
By Admin | Updated: June 14, 2016 00:19 IST2016-06-13T23:18:53+5:302016-06-14T00:19:46+5:30
सदाभाऊ खोत : शिराळा येथे भाजप कार्यकारिणी बैठक; पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शिवाजीराव नाईक व माझ्यात स्पर्धा नाही
कोकरूड : रिकामटेकड्या लोकांनी माझ्यात व आमदार शिवाजीराव नाईक यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगविल्या आहेत. परंतु आमच्यात कसलीही स्पर्धा नाही. नाईक यांच्यासारखा अभ्यासू व ज्येष्ठ माणूस पक्षात दुसरा नाही. त्यामुळे यांना सांगली जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे केला आहे, असे प्रतिपादन नूतन आ. सदाभाऊ खोत यांनी केले.
यशवंत सह. ग्लुकोज कारखान्याच्या सभागृहात शिराळा तालुका भाजप कार्यकारिणी पदाधिकारी नियुक्तीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. शिवाजीराव नाईक होते. प्रारंभ सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. तालुका भाजप कार्यकारिणीत निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
आ. खोत म्हणाले, आ. शिवाजीराव नाईक यांची ज्येष्ठता व अनुभव याचा विचार करून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अशी विनंती केली आहे. आम्ही दोघांनीही सातत्याने राजकीय संघर्ष केला आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढलो. याला परमेश्वराने आजअखेर साथ दिली आहे. आम्ही व खासदार राजू शेट्टी नेहमीच आ. नाईक यांच्या बाजूने राहिलो आहे. आम्हाला नेहमीच गुलालापासून वंचित राहावे लागत होते. परंतु पहिला गुलाल १९९५ ला आ. नाईक यांच्या आमदारकीचा मिळाला.
आ. नाईक म्हणाले, सदाभाऊ खोत गेली ३० ते ३५ वर्षे सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. त्यांना त्याचे फळ आमदारकीच्या रूपाने मिळाले आहे. सदाभाऊ आता आमदार म्हणून नव्हे, तर एका संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याच्या राजकीय पटलावर कार्यरत आहेत. त्यांना त्या पद्धतीचा सन्मान मिळत असल्याने, जर घटकपक्षांना मंत्रिपद मिळाले, तर सदाभाऊ यांचा दावा मजबूत आहे.
भाजप कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - तालुका भाजप अध्यक्ष- सुखदेव पाटील, उपाध्यक्ष- आनंदराव पाटील, रंगराव शेडगे, अमर माने, प्रतापराव नलवडे, विश्वास पाटील, दिलीप वरेकर, सरचिटणीस, दगडू ढेरे, राजेंद्र साळुंखे, चिटणीस - हरिभाऊ कवठेकर, सुधीर बाबर, सुनंदा पवार, शोभा केसरे, माधुरी पाटील, आक्काताई शिंदे, कोषाध्यक्ष - संपत पाटील यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी यशवंत दूध संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक एम. एस. कुंभार, बापूसाहेब शिंदे, गजानन पाटील, नामदेव पाटील, शहाजी पाटील, आनंदराव पाटील, बी. टी. पाटील, सी. एच. पाटील, भास्कर मोरे, उत्तम पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)