...तर मिरज मतदारसंघावरही शिवसेनेचा प्रबळ दावा
By Admin | Updated: September 11, 2014 23:08 IST2014-09-11T22:28:59+5:302014-09-11T23:08:55+5:30
अदलाबदलीची चर्चा : मिरज, सांगलीसाठी नेत्यांनी लावली जोरदार ‘फिल्डिंग’; भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम

...तर मिरज मतदारसंघावरही शिवसेनेचा प्रबळ दावा
सांगली : जिल्ह्यातील शिवसेनेकडे असलेले परंपरागत मतदारसंघ खेचण्यासाठी एकीकडे भाजपने ‘फिल्डिंग’ लावली असली तरी, अशा जागांच्या बदल्यात भाजपच्या काही महत्त्वाच्या जागांसाठी शिवसेना नेते आग्रही झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेना मिरजेसाठी सर्वाधिक आग्रही आहे. त्यासाठी शिवसेनेने मिरजेतील मागील निवडणुकांमधील सेनेच्या कामगिरीचे दाखलेही महायुतीच्या नेत्यांकडे दिले आहेत.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामध्ये सुरुवातीला सांगली आणि मिरज मतदारसंघांचा समावेश नव्हता. तेथे भाजपचे आमदार आहेत. भाजपने या तीन जागांशिवाय तासगाव-कवठेमहांकाळ आणि पलूस-कडेगावसाठी आग्रह धरला आहे. खासदार संजय पाटील यांनी त्यांचे मित्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत तासगाव-कवठेमहांकाळची जागा भाजपकडे घ्यायची आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करून राजकीय ताकद दाखविण्यासाठी ते सरसावले आहेत. अशावेळी संजय पाटील यांच्या आग्रहास्तव अन्य एखादी जागा सेनेला देण्याचाही विचार आता भाजपचे वरिष्ठ नेते करीत आहेत.
सांगलीच्या जागेवर दावा करून सेनेला येथे चांगला उमेदवार देणे जिकीरीचे बनले आहे. याउलट मिरज मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असून यापूर्वी मिरजेतून अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार लढत दिली आहे. बजरंग पाटील यांनी शिवसेनेकडून लढताना मिरज मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांनी दोनवेळा सेनेची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे सांगलीपेक्षा शिवसेना मिरजेलाच अधिक पसंती देत आहे. पर्याय म्हणून यापूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांनी या दोन्ही जागांसाठी आग्रह धरला होता. आता वरिष्ठ पातळीवर सेनानेते मिरजेला अधिक पसंती देत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ पाहिजे असेल तर मिरज, सांगली किंवा जतपैकी एक मतदारसंघ आम्हाला द्यावा, अशी मागणी सेना करत आहे. त्यातही पुन्हा मिरजेला अधिक पसंती आहे. जत आणि सांगलीत शिवसेनेला उमेदवार व कार्यकर्ते शोधावे लागणार आहेत. तशी परिस्थिती मिरजेत नाही. मिरज हाच मतदारसंघ शिवसेनेसाठी अधिक सुरक्षित आहे. एकूण परिस्थितीचा विचार केला, तर भाजपकडून तासगाव-कवठेमहांकाळसाठी अधिक ताकद लावली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
तासगाव-कवठेमहांकाळऐवजी आम्ही मिरज, सांगली व जत या तीन मतदारसंघांपैकी एक जागा मागितली आहे. मित्रपक्षांनाही काही जागा द्यायच्या असल्याने आम्ही यापूर्वीच जिल्ह्यात जादा जागांची मागणी केली होती. याविषयी आता लवकरच निर्णय होईल.
- दिवाकर रावते, संपर्कप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र शिवसेना
मिरजेलाच का पसंती?
सांगली व जत विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना फारशी सक्रिय नाही. निष्क्रियतेमुळे संदीप सुतार यांची नुकतीच जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी झाली आहे. याउलट शिवसेनेचे प्राबल्य मिरजेत अधिक असल्यानेच जिल्हाप्रमुखपद मिरजेच्या विकास सूर्यवंशी यांना देण्यात आले. या तिन्ही मतदारसंघात मिरजेतच शिवसेनेचे दखल घेण्यासारखे अस्तित्व दिसून येते. त्यामुळेच मिरजेसाठी वरिष्ठ पातळीवर अधिक आग्रह दिसत आहे.
लोकसभेचे गणित
लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांच्या प्रचारात संभाजी पवारांनी सहभाग घेतला नव्हता. जतचे आमदार प्रकाश शेंडगे आणि सुरेश खाडे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. त्यांच्यासह सांगलीतील काही स्थानिक नेत्यांना संजयकाकांनी फारसे सहभागी करून घेतले नव्हते. मिरजेतून अपेक्षित आघाडी मिळवून देण्यात खाडे यांचा सहभाग नव्हता. संजयकाकांना मिरजेतून आघाडी मिळाली, ती राष्ट्रवादीच्या छुप्या मदतीवर! मिरज पूर्व भागात अजितराव घोरपडेंचा गट अजूनही प्रबळ आहे. मात्र त्यांचेही खाडेंशी सख्य नाही. त्यामुळे सांगली, मिरजेपैकी एक जागा देण्यासाठी खा. संजय पाटील किंवा भाजपचे अन्य नेते फार विचार करतील, असे वाटत नाही.