खानापूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:34+5:302021-01-19T04:27:34+5:30
खानापूर तालुक्यातील १३ पैकी तांदळगाव व भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ११ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान ...

खानापूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा
खानापूर तालुक्यातील १३ पैकी तांदळगाव व भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ११ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी विटा येथील प्रांताधिकारी कार्यालयाजवळच्या शासकीय धान्य गोदामात सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.
देविखिंडी, खंबाळे (भा.), पारे, माहुली या चार ग्रामपंचायतीत आ. बाबर समर्थक सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला खाते उघडता आले नाही. माहुलीत आ. बाबर, माजी आ. पाटील व आ. गोपीचंद पडळकर यांच्या गटात झालेल्या तिरंगी लढतीत सर्व ११ जागांवर आ. बाबर समर्थकांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले. नागेवाडी येथे आ. बाबर समर्थक गटाला ९ तर माजी आ. पाटील गटाला दोन जागा मिळाल्या. देविखिंडी, खंबाळे (भा.), पारे येथे सर्व जागा जिंकून शिवसेनेने भगवा झेंडा फडकविला. रेणावी येथे शिवसेनेला ५ तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला ४ जागा मिळाल्या आहेत. मेंगाणवाडी ग्रामपंचायतीवर ही आ. बाबर समर्थक गटाची सत्ता आली आहे. भिकवडी बुद्रुक येथे ९ पैकी ७ जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसने जिंकल्या असून, २ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे. पोसवाडी येथे सात पैकी ५ जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसने तर दोन जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. खानापूर पूर्व भागातील शेडगेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा झेंडा फडकला आहे. माजी आ. सदाशिवराव पाटील समर्थक गटाला ६ जागा मिळाल्या असून, आ. बाबर यांच्या वाट्याला एकच जागा आली आहे.
मंगरूळ येथील निवडणूक कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जि. प. सदस्य रामरावदादा पाटील व माजी आ. पाटील यांच्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकत्रित लढविली होती. या निवडणुकीत नऊ पैकी ७ जागा कॉँग्रेसने तर २ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला. या निवडणुकीत राजकारणात पहिले पाऊल टाकलेले रामरावदादांचे नातू अभिजीत पाटील विजयी झाले आहेत. तांदळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात ७ पैकी शिवसेनेचे ४ तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ३ सदस्य आहेत, तसेच भडकेवाडी ग्रामपंचायतही बिनविरोध झाली असून, आ. बाबर व कॉँग्रेसचे माजी जि. सदस्य सुहासनाना शिंदे समर्थक ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित २ जागा रिक्त आहेत. पारे ग्रामपंचायतीतही आ. बाबर समर्थक ७ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या चारही जागांवर आ. बाबर गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकंदरीत, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी ग्रामीण भागावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विटा शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट
अवघ्या ४१ मिनिटांत मतमोजणी पूर्ण
खानापूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सोमवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार हृषीकेश शेळके यांनी नियोजनबद्ध मतमोजणीची प्रक्रिया राबविली. अवघ्या ४१ मिनिटांत सर्व ११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला.
फोटो - १८०१२०२१-विटा-निवडणूक खंबाळे :- खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकून निर्विवाद यश मिळाल्यानंतर शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांची त्यांच्या निवासस्थानी समर्थक कार्यकर्त्यांनी भेट घेतली.