भाजपच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा : जयंत पाटील
By Admin | Updated: March 22, 2015 00:23 IST2015-03-22T00:23:15+5:302015-03-22T00:23:15+5:30
सरकारमध्ये शिवसेनेची परिस्थिती फार वाईट

भाजपच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा : जयंत पाटील
विटा : सध्या राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार नसून फक्त भाजपचेच आहे. त्यांच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा जोडला आहे. कारण भाजपला सेना सत्तेत नकोच आहे. त्यामुळे सध्या सरकारमध्ये शिवसेनेची परिस्थिती फार वाईट आहे, अशी टीका माजी ग्रामविकास मंत्री आ. जयंत पाटील यांनी केली.
विटा येथे नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या सदाशिवराव (भाऊ) पाटील भाजी मंडई सुशोभिकरण व मच्छी मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, विनायकराव पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक, नगरपालिकेचे पक्षप्रतोद वैभव पाटील, भारत पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही त्यांना मदत देण्याबाबत केंद्र शासन उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा पंतप्रधानांना दुसऱ्या देशातील प्रश्नांची अधिक चिंता आहे. विटा शहरात इस्लामपूरपेक्षा जादा सुविधा आहेत. आम्ही आज सत्तेत नसलो तरी शहराच्या वाढीव घोगाव पाणी योजनेला निधी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.
माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले, गेल्या १० वर्षांत शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. परंतु, काही अपप्रवृत्तींनी लोकांमध्ये खोटा प्रचार करून चुकीचे संदेश दिले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. या कार्यक्रमास जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अॅड. सचिन जाधव, दहावीर शितोळे, प्रतिभा चोथे, लता मेटकरी, स्वाती भिंगारदेवे, विकास जाधव, अमित भोसले, शमशुद्दीन तांबोळी, रणजित कदम, अविनाश चोथे, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. आभार अविनाश चोथे यांनी मानले. (वार्ताहर)