शिवसेना स्वबळावर जिल्हा बँक निवडणूक लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:32+5:302021-09-22T04:29:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : समविचारी पक्षांनी अद्याप संपर्क केला नसल्याने शिवसेनेमार्फत सांगली जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविण्यात येईल, ...

शिवसेना स्वबळावर जिल्हा बँक निवडणूक लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : समविचारी पक्षांनी अद्याप संपर्क केला नसल्याने शिवसेनेमार्फत सांगली जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविण्यात येईल, असा निर्धार शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत केला.
माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. बैठकीस माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार उपस्थित होते. घोरपडे म्हणाले की, सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी चांगली झालेली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात काम करणारे भरपूर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयार झालेले आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार येणारी जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी करणार आहे.
विभुते व पवार म्हणाले की, अद्याप आमच्याशी कोणत्याही समविचारी पक्षाने संपर्क केलेला नाही. लवकरच याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती आखण्यात येईल. जिल्हा बँक निवडणुकीसाठी गठित केलेली कोअर कमिटी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी करेल.
यावेळी जिल्हा संघटक बजरंग पाटील, चंदन चव्हाण, साहेबराव पाटील, अविनाश पाटील, सुभाष मोहिते, नंदकुमार निळकंड, महादेव मगदूम, नानासाहेब शिंदे, अरुण खरमाटे, हरिदास लेंगरे, डॉ. किशोर ठाणेकर, प्रदीप पाटील, अंकुश हुबाळे, नितीन शिंदे, शिवाजी पवार, जयवंत माळी, रूपेश मोकाशी, विजय शिंदे आदी उपस्थित होते.