शिवसेना राष्ट्रवादीला म्हणते, ‘अंगावर याल तर शिंगावर घेऊ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:24+5:302021-08-17T04:32:24+5:30
सांगली : सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ...

शिवसेना राष्ट्रवादीला म्हणते, ‘अंगावर याल तर शिंगावर घेऊ’
सांगली : सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी याचा निषेध करताना ‘अंगावर याल तर शिंगावर घेऊ’ असे थेट आव्हानच राष्ट्रवादीला दिले आहे.
सोलापुरात एका कार्यक्रमावेळी दत्तामामा भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘मुख्यमंत्री मरु द्या, माझ्या अजितदादांना आशिर्वाद द्या’ असे विधान त्यांनी केले होते. त्यावरुन शिवसेनेत नाराजी व्यक्त केली जात आहे.
सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विभुते यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भरणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्याचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करतो. जर ते अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेऊ. खरंतर त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आले आहे. राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर सत्तेत राहून शिवसेनेलाच त्रास देत आहे. दत्तामामांच्या रुपाने आलेले विधान राष्ट्रवादीचेच आहे. भाजपने शिवसेनेशी गद्दारी केली नसती तर आज राष्ट्रवादी नामशेष झाली असती, परंतु शिवसेना पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडी केली आणि सत्तेत हे दोन्ही पक्ष आले.
आम्ही सातत्याने पाठीमागचा इतिहास विसरून एकोप्याने राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, परंतु राष्ट्रवादी मात्र शिवसेनेबरोबर कधीही इमानदारीने राहात नाही, हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेचा नाद अजिबात करू नये. शिवसेनेने राष्ट्रीय पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. राष्ट्रवादी तर प्रादेशिक पक्ष आहे. महाविकास आघाडीत आम्ही सत्तेत जरी राष्ट्रवादीबरोबर असलो तरी एकही शब्द मुख्यमंत्री व शिवसेनेच्याबाबतीत खपवून घेणार नाही, हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने आणि दत्तामामांनी लक्षात ठेवावे. उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीने व दत्तामामांनी जाहीर माफी मागावी, असे आवाहनही विभुते यांनी केले.