तापलेल्या राजकीय वातावरणात शिवसेना थंडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:46+5:302021-04-05T04:22:46+5:30
सांगली : केंद्रातील भाजप सरकारविरोधात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीने आंदोलनातून रान पेटविले असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपनेही आक्रमक आंदोलने सुरु केली ...

तापलेल्या राजकीय वातावरणात शिवसेना थंडच
सांगली : केंद्रातील भाजप सरकारविरोधात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीने आंदोलनातून रान पेटविले असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपनेही आक्रमक आंदोलने सुरु केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कार्यकर्ते, नेते अन्य पक्षात गेल्याने घायाळ झालेली शिवसेना मात्र या तप्त राजकीय वातावरणात थंडच आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेला राष्ट्रवादीने जोरदार सुरुंग लावला आहे. शिवसेना नेते शेखर माने, माजी उपजिल्हाप्रमुख अजिंक्य पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारीही थंड आहेत. कर्नाटक सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही. इंधन, गॅस दरवाढीसारखे इतके ज्वलंत प्रश्न असताना त्याविषयी शिवसेनेने आंदोलन करणे टाळल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने तसेच त्यांच्या विविध सेलमार्फत इंधन व गॅस दरवाढीविरोधात सतत आंदोलन सुरू आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलने करुन ते शासनाचे लक्ष वेधत आहेत.
राज्यात विरोधात असलेल्या भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात आंदोलनांचे रतीब सुरू केले आहे. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याचे काम आंदोलनातून ते करीत आहेत. त्यामुळे या ना त्या निमित्ताने सर्वच पक्ष आंदोलनात उतरुन राजकीय वातावरण तापवित आहेत. या सर्वांपासून शिवसेना दूर आहे. तापलेल्या या राजकीय वातावरणात ते अलिप्त राहून थंडावा अनुभवत आहेत.
चौकट
प्रश्नांकडेही दुर्लक्ष
शहरासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांना भेटून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यातील अनेक प्रश्नही त्यांनी मार्गी लावले. दुसरीकडे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असतानाही शिवसेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकाही प्रश्नाबाबत पाठपुरावा केला नाही. त्यामुळे कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी विविध संघटना सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जात आहेत.
चौकट
इनकमिंग नाही, केवळ आऊटगोईंग
राज्यात सत्तास्थानी आल्यापासून सांगली जिल्ह्यातील शिवसेनेतून कार्यकर्त्यांचे आऊटगोईंगच सुरू आहे. अन्य पक्षातून एकही महत्त्वाचा कार्यकर्ता किंवा नेता पक्षात आला नाही.