शिवजयंती उत्सव अलोट उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:29+5:302021-02-20T05:18:29+5:30

सांगली : शहरात शिवभक्तांनी अलोट उत्साहात शिवजयंती साजरी केली. विविध उपक्रमांनी शिवरायांना अभिवादन केले. कोरोनामुळे रॅलीवर निर्बंध असले तरी, ...

Shiv Jayanti celebration celebrated with great enthusiasm | शिवजयंती उत्सव अलोट उत्साहात साजरा

शिवजयंती उत्सव अलोट उत्साहात साजरा

सांगली : शहरात शिवभक्तांनी अलोट उत्साहात शिवजयंती साजरी केली. विविध उपक्रमांनी शिवरायांना अभिवादन केले. कोरोनामुळे रॅलीवर निर्बंध असले तरी, पुतळा पूजन, व्याख्याने, आरोग्य शिबिरे, प्रसाद असे कार्यक्रम झाले.

मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यामुळे फक्त पुतळा पूजन झाले. शिवाजी मंडईनजीकच्या अश्वारूढ पुतळ्याला देखणी रोषणाई व सजावट करण्यात आली होती. पुतळ्यामागे आकर्षक मेघडंबरी तयार केली होती.

सकाळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. मराठा सेवा संघातर्फेही अभिवादन करण्यात आले होते. पुतळ्याभोवती उभारलेल्या स्टेजवर दिवसभर शिवभक्तांची गर्दी होती. विविध संस्था, संघटनांतर्फे लाडू व जिलेबीचे वाटप केले.

महापालिकेतही शिवरायांना अभिवादन करण्यात आले. स्टेशन चौक, शास्त्री चौक, वखारभाग, संजयनगर, विश्रामबाग आदी ठिकाणी पुतळा पूजन झाले. शांतिनिकेतनसमोर रुद्राक्ष फाऊंडेशनने शिवजयंती धडाक्यात साजरी केली. कोरोनामुळे पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्याने मावळा रॅलीसह अन्य सर्व मिरवणुका रद्द करण्यात आल्या.

मराठा समाज संघटनेतर्फे अध्यक्ष ॲड. उत्तमराव निकम यांनी प्रतिमापूजन केले. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात गाडगीळ यांनी प्रतिमापूजन केेले. यश‌वंतनगरला मृत्युंजय ग्रंथालयात विजय पवार यांनी पुतळ्याचे पूजन केले. यावेळी उदय महाले, विशाखा पवार आदी उपस्थित होते. वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अध्यक्ष विशाल पाटील यांनी पुष्पहार घातला. यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, संचालक अमित पाटील, संजय पाटील, रामचंद्र पाटील, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते.

चौकट

ब्लोअरमधून पुष्पवृष्टी, मशाल रॅली

सायंकाळी शिवपुतळ्यावर ब्लोअरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. रोषणाईच्या प्रकाशातील पुष्पवृष्टीचा नयनमनोहर सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर पुतळ्याभोवतीच मशाल रॅली काढण्यात आली.

Web Title: Shiv Jayanti celebration celebrated with great enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.