शिराळे खुर्दला बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:43+5:302021-03-31T04:26:43+5:30
पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) : येथील तानाजी बाळू सुर्ले यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला. ...

शिराळे खुर्दला बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार
पुनवत :
शिराळे खुर्द (ता. शिराळा) : येथील तानाजी बाळू सुर्ले यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. शिराळे खुर्द येथे गावच्या पश्चिमेला विठ्ठल मंदिराजवळ तानाजी सुर्ले यांची जनावरांची वस्ती आहे. वस्तीवर गायी, म्हशी, आठ शेळ्या व बोकड अशी २२ जनावरे आहेत. कुत्रा वस्तीच्या दरवाजाजवळ बाहेरच्या बाजूला बांधलेला होता. सुर्ले यांनी रात्री दहाच्या सुमारास सर्व जनावरांस चारा घालून वस्तीचा दरवाजा बंद केला. मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून बाहेर बांधलेल्या कुत्र्याला ठार केले. कुत्र्याला जागेवरच अर्धवट खाऊन तो पसार झाला. वस्तीच्या जवळील शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. वनरक्षक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच किरण पाटील, उपसरपंच लक्ष्मण सुर्ले, जे. के. पाटील, बाबुराव काळे, अभिजित रोकडे, वसंत पाटील उपस्थित होते.
चौकट
हल्लासत्र थांबणार कधी?
गेल्या आठ ते दहा दिवसांत कणदूर, पुनवत, शिराळे खुर्द परिसरात बिबट्याचे हल्लासत्र सुरू आहे. कणदूर येथे दोन ठिकाणी हल्ले व एका ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पुनवत- माळवाडी येथे बिबट्याने आठ शेळ्या ठार केल्या, तर आता शिराळे खुर्द येथे कुत्रा ठार केला. पुढील अनर्थ होण्याआधी वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.