शिराळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
By Admin | Updated: October 1, 2015 22:49 IST2015-10-01T22:49:21+5:302015-10-01T22:49:21+5:30
मानसिंगराव नाईक : तहसील कार्यालयावर मोर्चा, कर्जे माफ करण्यासह विविध मागण्या

शिराळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
शिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी पाऊस न झाल्याने भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे हा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत. तसेच दुष्काळाचे सर्व निकष लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी गुरुवारी दिला.आमदार शिवाजीराव नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी ‘होय, वाकुर्डे योजना पूर्ण करणे येड्यागबाळ्याचे काम नव्हे, कारण पंधरा वर्षे तुम्ही आमदार असताना ही योजना पूर्ण करू शकला नाही. योजना पूर्ण करण्यासाठी अंगात पाणी पाहिजे. नुसत्या मोठ्या गप्पा मारुन चालत नाही’, असा टोलाही लगावला.
शिराळा येथील तहसील कार्यालयावर शिराळा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अंबामाता मंदिरापासून या मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा मुख्य रस्ता, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, एस. टी. बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसीलदार विजय पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तेथे माजी आमदार नाईक म्हणाले, तालुक्यात १९७२ पेक्षा भयानक परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने धरणे, तलाव पूर्ण भरलेले नाहीत. पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. शेतकऱ्यांची पिके वाया जाऊ लागली आहेत. पशुधन कसे वाचवायचे, हा प्रश्नही गंभीर होत आहे. शेतातील पिके वाळली आहेत. त्यामुळे ती पिके काढण्यासाठी खर्च नको म्हणून शेतकरी शेतीकडेही फिरकत नाही. शासनाने याचा गंभीरपणे विचार करावा. पीक आणेवारी ३३ टक्के करावी.
शिवाजीराव नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना नाईक म्हणाले की, तालुक्यात २२ कोटींचा गिरजवडे प्रकल्प मंजूर केला. त्याचे कामही वेगात सुरू होते. मात्र विद्यमान आमदारांनी श्रेयवादासाठी या प्रकल्पाचा निधी अडवून हे काम बंद पाडले आहे. सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभेत तुमच्या संस्थेबद्दल बोला, तुम्ही किती ऊस दर जाहीर केला, ते सांगा. तुम्ही शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ऊस दरासाठी आंदोलन केले आहे, पण तुमच्या ऊसदराचे काय केले, ते बोला! वाकुर्डे योजनेचे तुम्ही पंधरा वर्षांत काय केले? किती निधी आणला? मी पाच वर्षात १२५ कोटींचा निधी आणून ही योजना मार्गी लावली. तुमच्यासारख्या येड्यागबाळ्याचे ही योजना पूर्ण करण्याचे काम नाही.
यावेळी डॉ. धनंजय माने, राष्ट्रवादीचे तालुक्याध्यक्ष विजयराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सम्राटसिंह नाईक, माजी सभापती अॅड. भगतसिंह नाईक, शिवाजीराव घोडे-पाटील, दिनकरराव पाटील, रणजितसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, शंकरराव चरापले, विलासराव पाटील, विराज नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण, विश्वास कदम उपस्थित होते. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
आंदोलकांच्या मागण्या
वाकुर्डे योजनेतून येणाऱ्या पाण्याचा वापर करून उत्तर भागातील सर्व धरणे, तलाव भरुन घ्यावेत.
रब्बी हंगामासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात बियाणे, खते उपलब्ध व्हावे.
वाकुर्डे योजनेसाठी ५४२.१९ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा.
८० मीटरच्या उपसा सिंचन योजना शासकीय खर्चाने पूर्ण कराव्यात.
गिरजवडे प्रकल्पाचे थांबलेले काम त्वरित चालू करावे.
शेती पंपाची वीज बिले माफ करावीत.
पीक कर्जे माफ करावीत. पाणीपट्टी माफ करावी.