शिराळा भुईकोट किल्ला, संभाजी महाराजांच्या स्मृती जतन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:58+5:302020-12-05T05:05:58+5:30
शिराळा : शिराळा भुईकोट किल्ला आणि या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जतन होण्याबरोबरच या क्षेत्राचा पर्यटन ...

शिराळा भुईकोट किल्ला, संभाजी महाराजांच्या स्मृती जतन करणार
शिराळा : शिराळा भुईकोट किल्ला आणि या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जतन होण्याबरोबरच या क्षेत्राचा पर्यटन विकास व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार धैर्यशील माने, आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली. चांदोली अभयारण्य परिसर विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. याबाबत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
खा. माने, आ. नाईक म्हणाले, शिराळा भुईकोट किल्ला याबरोबरच चांदोली अभयारण्य पर्यटन विकास, शिराळा गोरक्षनाथ मंदिर आणि त्याचबरोबर शिरटे (ता. वाळवा) येथील सीताईदेवी मंदिर या ठिकाणीसुद्धा पर्यटनाच्यादृष्टीने विकास व्हावा, यासाठी प्रयत्न आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान व होऊ घातलेला व्याघ्र प्रकल्प, वीज प्रकल्प, निमसदाहरित अभयारण्याजवळच असलेले गुढे-पाचगणी थंड हवेचे ठिकाण या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे महत्त्वाचे आहे. या परिसरात पर्यटन विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. या परिसरातून कामासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी, माथाडी कामगार म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या युवकांचा लोंढा थांबेल व त्याला रोजगार अथवा व्यवसाय करण्याची संधी येथेच उपलब्ध होईल. जिल्ह्यातील किंबहुना राज्यातील एक प्रसिध्द पर्यटन क्षेत्र म्हणून शिराळा तालुका किंबहुना सांगली जिल्हा नावारूपास येईल. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चांदोली येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. इको फ्रेंडली पध्दतीने चांदोली धरण परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री ठाकरे यांना माहिती दिली. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री ठाकरे यांच्यासोबत या सर्वच ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, याकरिता सविस्तर आढावा बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी चांदोलीसह सर्व ठिकाणचे प्रस्ताव तयार करून द्यावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.
फोटो ओळ - मुंबई येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शिराळा तालुका पर्यटनाबाबतचे निवेदन खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिले.