एसटीचा श्रावणात शिमगा; पाच हजार कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांपासून लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:15+5:302021-08-17T04:32:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागातील चार हजार ९६४ कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी ...

एसटीचा श्रावणात शिमगा; पाच हजार कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांपासून लटकले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागातील चार हजार ९६४ कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी पगार झालेला नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुला-मुलींचे शिक्षण, लग्नाचा खर्च करायचा कसा, असे प्रश्न अनेक चालक, वाहकांना भेडसावत आहेत. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न कायमचा सोडवावा, अशी एस. टी. संघटनांची मागणी आहे.
गेल्या दोन वर्षांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. रोजंदारीवरील २८५ चालक-वाहकांना तर कामावर बोलावले तरच पगार मिळतो. उर्वरित दिवसाचा पगारही मिळत नाही. यामुळे रोजंदारीवरील चालक व वाहकांवर बेरोजगारीचीच वेळ आली आहे. अन्य कर्मचाऱ्यांनाही जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांनी पगाराबद्दल अधिकाऱ्यांना विचारले तर पैसेच नाहीत तर पगार कुठून देणार, अशी उत्तरे मिळत आहेत. यामुळे एस. टी.चे कर्मचारी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.
चौकट
आकडे काय सांगतात
आगार कर्मचारी संख्या
सांगली ५७७
मिरज ४५९
इस्लामपूर ४३०
तासगाव ३८६
विटा ३५६
जत ३७५
आटपाडी २७३
क. महांकाळ ३०३
शिराळा ३९४
पलूस २१७
वर्कशॉप ८८५
इतर कर्मचारी ३०९
एकूण ४९६४
चौकट
उसनवारी तरी किती दिवस करायची?
कोट
अनेक कर्मचाऱ्यांचे हातावरचे पोट असून, पगार झाला तरच त्यांचा संसार चालतो. अशावेळी दोन ते तीन महिने पगार नाही, तर कर्मचाऱ्यांचा संसार कसा चालणार आहे. पैसे उसने घेऊन किती दिवस संसार चालवायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
-नारायण सूर्यवंशी, विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
कोट
प्रामाणिक काम करूनही एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. घराचा संसार चालविणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने महिन्याच महिन्याला पगार केला पाहिजे.
-विलास जाधव, कर्मचारी
चौकट
उत्पन्न कमी; खर्च जास्त
-एसटी महामंडळाच्या सांगली विभागाचा महिन्याचा खर्च सध्या ७५ लाख रुपये आहे. उत्पन्न मात्र ३७ लाख रुपये मिळत आहे. महिन्याला ३८ लाखांचा तोटा असून, तो कसा भरून काढायचा, असा आमच्यासमोर प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नाचे गणिक कोलमडले आहे, अशी खंत विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी व्यक्त केले.
-एसटीचे उत्पन्न सुरळीत होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणे कठीणच आहे, असेही काही अधिकारी खासगीत सांगत आहेत.
कोट
एसटी महामंडळाच्या सांगली विभागातील कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार झाला आहे. पण, जुलै महिन्याच्या पगार झाला नाही. पगारासाठी वरिष्ठ कार्यालयांकडे निधीची मागणी केली आहे. निधी मिळताच सर्व कर्मचाऱ्यांचे पगार केले जाणार आहे.
-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभागीय कार्यालय, एसटी महामंडळ