पोलिस ठाण्यातून पलायन केलेल्या महिलेस शिर्डीत अटक
By Admin | Updated: June 14, 2016 23:58 IST2016-06-14T23:50:16+5:302016-06-14T23:58:06+5:30
मासिक धर्माचा बहाणा : इस्लामपूर पोलिसांची शोधमोहीम

पोलिस ठाण्यातून पलायन केलेल्या महिलेस शिर्डीत अटक
इस्लामपूर : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या कोल्हापूरच्या संशयित महिलेला अखेर पोलिसांनी तिसऱ्या दिवशी पकडले. शनिवारी पहाटे तिने मासिक पाळी आल्याचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर पोलिसांनी तिला शिर्डी येथे ताब्यात घेतले.
पूनम संतोष माने-जाधव (वय २०, रा. रेल्वे स्टेशनजवळ, कोल्हापूर) असे या पळून गेलेल्या महिलेचे नाव आहे. इस्लामपूर पोलिसांच्या कोठडीत असताना तिने शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. तिच्या शोधासाठी तिन्ही जिल्ह्यांत पथके रवाना झाली होती. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी विशेष पोलिस पथक रवाना केले. ही महिला व तिचा पती असे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रावण कांबळे यांच्या सोबत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. तसेच हे तिघे तिरूपतीला जात असल्याची हूल देऊन शिर्डीला गेल्याचीही माहिती मिळाली.
त्यानुसार पथकातील अवधूत इंगवले, अझहर शेख, सचिन कणप, संतोष देसाई, राजू पाटील, गजानन जाधव, महिला पोलिस अंजूम मुजावर यांनी साध्या वेशात सापळा रचून पूनमला ताब्यात घेतले. त्यापूर्वी पथकाने सांगली, मिरज, कोल्हापूर, वाठार, ढेबेवाडी, कऱ्हाड परिसरात शोधमोहीम राबवली होती. (वार्ताहर)