कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेटफळेकर सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:24+5:302021-05-01T04:26:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहत असणाऱ्या शेटफळे गावातील नागरिक कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरसावले आहेत. गावातील ...

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेटफळेकर सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहत असणाऱ्या शेटफळे गावातील नागरिक कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरसावले आहेत. गावातील हायस्कूलमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात मिनी कन्टेन्मेंट झोन तयार केले आहेत. यासह होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांची तपासणी दररोज केली जात आहे. ग्रामपंचायतीने कोविड केअर सेंटरसाठी औषधे खरेदी केली असून शेटफळेकरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी चंग बांधला आहे.
गेल्या महिनाभरापासून शेटफळे गावामध्ये दररोज दहा ते पंधरा कोरोना रुग्ण आढळत आहेत. ग्रामपंचायत व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक प्रयोग केले. नागरिकांना लस देण्यातही शेटफळेकरांनी आघाडी ठेवत बहुतांशी जेष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घेतले आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने रुग्णाला होमआयसोलेशनऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्याचा प्रयोग केला गेला. मात्र, रुग्णसंख्येत जास्तच वाढ होऊ लागल्याने शेटफळे आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रुग्णांना औषधोपचार सुरू आहेत तर गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी ऑक्सिजन बेड व इतर व्यवस्थाही शेटफळे गावातील युवकांनी केली आहे.
चाैकट
कोविड केअर सेंटरसाठी औषध खरेदी
शेटफळे हायस्कूल येथे उभारलेले कोविड केअर सेंटरसाठी शेटफळे ग्रामपंचायतीने ४२ हजार रुपयांच्या औषधांची खरेदी करून आरोग्य अधिकाऱ्यांकडे दिली आहेत. शेटफळेतील नागरिकांच्या आरोग्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सरपंच नीता गायकवाड, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, सदस्य सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यासह आपप्ती व्यवस्थापन समितीतील सदस्य शेटफळेतून कोरोना हद्दपार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.