‘त्या’ बेवारस वृद्धेला घेतले दत्तक
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:39:41+5:302015-02-21T00:16:37+5:30
अखेर आधार मिळाला : कोल्हापुरातील वसतिगृहाचा पुढाकार

‘त्या’ बेवारस वृद्धेला घेतले दत्तक
सचिन लाड - सांगली -हाता-पायात किडे पडल्यानंतर रुग्णालयात दाखल केलेली ‘ती’ ५५ ते ६० वर्षीय बेवारस वृद्धा तब्बल दीड महिन्याच्या औषधोपचारानंतर ठणठणीत बरी झाल्यानंतर, या वृद्धेला दत्तक घेण्यासाठी कोल्हापुरातील तेजस्विनी शासकीय महिला वसतिगृहाने पुढाकार घेतला आहे. ‘लोकमत’मधून या वृद्धेविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची वसतिगृह प्रशासनाने दखल घेऊन तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरुवातीपासून या वृद्धेला मदतीचा हात देणाऱ्या सांगलीतील इन्साफ फौंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व प्राणीमित्र मुस्तफा मुजावर यांनी प्रयत्न केले.
दोन महिन्यांपूर्वी ही वृद्धा शहरातील सांगली अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला तडफडत पडली होती. तिच्या हाता-पायाला तारा गुंडाळलेल्या होत्या. अंगात फाटके-तुटके कपडे होते. थंडीच्या कडाक्यात भुकेने व्याकुळ होऊन ती विव्हळत पडली होती. तिच्या हाता-पायाला जखमा झालेल्या होत्या. त्यातून किडे बाहेर पडत होते. दुर्गंधी पसरल्याने तिच्या समोरून जाण्याचे धाडसही कोणी करीत नव्हते. हाता-पायाला झालेल्या जखमांमुळे तिला उभेही राहता येत नव्हते. इन्साफ फौंडेशनचे अध्यक्ष मुस्तफा मुजावर, तौफीक शेख, प्रताप शिंत्रे, निखिल सातपुते, अनिल बेपारी, रोहित दांडेकर यांनी या वृद्धेस मदतीचा हात देऊन उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दीड महिन्याच्या उपचारानंतर ही वृद्धा आता बरी झाली आहे.
ती मनोरुग्ण असल्याने तिला तिचे नाव व गाव सांगता येत नाही. यामुळे तिला सोडायचे कुठे, असा प्रश्न होता. ‘लोकमत’ने याविषयी गेल्या आठवड्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन कोल्हापूरचे तेजस्विनी शासकीय महिला वसतिगृह पुढे आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वृद्धेचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापुरातील वसतिगृहात तिच्या राहण्याची, जेवणाची सोय होणार आहे. पुन्हा तिला रस्त्यावर भटकण्याची वेळ येणार नाही. तिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे वसतिगृहात नेणार असल्याचे सांगितले. मात्र तिने जाण्यास नकार दिला. पण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिची समजूत काढली.
वृध्देच्या डोळ्यात अश्रू
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काल (गुरुवार) दुपारी वृद्धेला खासगी रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातील शासकीय वसतिगृहात नेले. दोन महिन्याच्या सहवासामुळे वृद्धेला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सहवास लाभला होता. तिची चांगली काळजी घेण्यात आली होती. यामुळे कोल्हापूरला नेताना तिच्या डोळ्यात अश्रू उभारले होते.
‘लोकमत’ने दिला
मदतीचा हात