‘ती’ बेवारस वृद्धा मृत्यूच्या दाढेतून बाहेर!

By Admin | Updated: February 13, 2015 22:58 IST2015-02-13T22:33:25+5:302015-02-13T22:58:27+5:30

दीड महिने सेवा : ‘इन्साफ फौंडेशन’चा पुढाकार; ‘सिव्हिल’कडून औषधोपचार

'She' unemployed old man out of death! | ‘ती’ बेवारस वृद्धा मृत्यूच्या दाढेतून बाहेर!

‘ती’ बेवारस वृद्धा मृत्यूच्या दाढेतून बाहेर!

सचिन लाड - सांगली -बरोबर दीड महिन्यांपूर्वीची घटना. साठ वर्षांची वृद्धा... हाता-पायात किडे पडलेली... स्वत:च्या पायावर उभे राहून चालताही येत नव्हते... अशा अवस्थेत भुकेने व्याकुळ झालेली... ‘कोणी तरी मला दवाखान्यात न्या रे’, असा तिचा टाहो सुरू होता. मृत्यूशी झुंज देत रस्त्यावरच तडफडत पडलेली ही वृद्धा आता ठणठणीत बरी होऊन स्वत:च्या पायावर चालू लागली आहे. कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही. मात्र इन्साफ फौंडेशन ही सामाजिक संस्था व सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाने या वृद्धेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. यासाठी दीड महिना तिच्यावर औषधोपचार सुरू होते.
येथील सांगली अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही वृद्धा तडफडत पडली होती. हाताला व पायाला तारा गुंडाळलेल्या होत्या. अंगात फाटके-तुटके कपडे होते. ही वृद्धा कोण? कोठून आली? याची कुणालाही माहिती नव्हती. थंडीच्या कडाक्यात भुकेने व्याकुळ होऊन विव्हळत पडली होती. तिच्या हाताला व पायाला जखमा झालेल्या होत्या. त्यातून किडे बाहेर पडत होते. दुर्गंधी पसरल्याने तिच्या समोरून जाण्याचे धाडस कोणीही करीत नव्हते. हाता-पायाला झालेल्या जखमांमुळे तिला स्वत:च्या पायावर उभे राहताही येत नव्हते. ‘प्यायला कोणी पाणी तरी देता का?’ असे म्हणून ती ओरडत होती. रस्त्यावरून जाणारा प्रत्येकजण केवळ बघ्याची भूमिका घेत होता.
सांगलीतील इन्साफ फौंडेशन या सामाजिक संस्थेला याची माहिती मिळाल्यावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राणिमित्र मुस्तफा मुजावर, तौफीक शेख, प्रताप शिंत्रे, निखिल सातपुते, अनिल बेपारी, रोहित दांडेकर यांनी या वृद्धेची भेट घेतली. तिला शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविली. परंतु वृद्धेकडे पाहून रुग्णवाहिका चालकही तिला नेण्यास तयार होत नव्हता. शेवटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिका मिळविली. त्यानंतर वृद्धेला रुग्णालयात दाखल केले.
दीड महिन्यांपासून तिच्यावर सुरु होते. यासाठी लागणारी औषधे रुग्णालय व संस्थेने उपलब्ध केली. उपचारादरम्यान संस्थेचे पदाधिकारी दररोज जाऊन माहिती घेत होते. ती आता ठणठणीत बरी झाली आहे. स्वत:च्या पायावर उभा राहून चालते. हात-पाय बरे झाल्याचे हास्य तिच्या चेहऱ्यावर दिसून येते.


पायाला दोरे, तार बांधून जखम झाल्याने मृत्यूशी झुंज...
हात आणि पाय दुखत असल्याने ही वृद्धा दोरे व तार बांधायची. यातून तिला जखमा झाल्या होत्या. या जखमावर औषधोपचार न झाल्याने किडे पडले होते, अशी माहिती उपचार करताना समोर आली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास कुऱ्हेकर, सहाय्यक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक भारती यांच्या पथकाने वृद्धेवर उपचार केले. रुग्णालयातील समाज सेवा अधीक्षक संजय खाडे व किरण कांबळे यांनी मदत केली. एका बेवारस व मृत्यूच्या दाढेत गेलेल्या वृद्धेला बाहेर काढणे, हे मोठे आव्हान होते. केवळ इन्साफ फौंडेशने पुढाकार घेतल्याने ही शक्त झाले, असे डॉक्टरांनी सांगितले.



प्रकृती ठणठणीत झालेल्या वृद्धेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. यामुळे तिला तिचे नाव व गाव सांगता येत नाही. आता तिला सोडायचे कुठे? असा प्रश्न पडला आहे. तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तरी पुढे यावे, असे आवाहन मुस्तफा मुजावर यांनी केले आहे.

Web Title: 'She' unemployed old man out of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.