‘त्या’ महिलेच्या खुनाचे गूढ कायम
By Admin | Updated: July 26, 2015 00:16 IST2015-07-26T00:09:39+5:302015-07-26T00:16:52+5:30
मृतदेह अनोळखीच : येळावीत सापडले धड; गुंता वाढला

‘त्या’ महिलेच्या खुनाचे गूढ कायम
तासगाव : आमणापूर (ता. पलूस) येथे येळावी रस्त्यालगत अनोळखी महिलेचे तोडलेले हात व पाय मिळून आल्यानंतर शुक्रवारी येळावी (ता. तासगाव) हद्दीतील एका शेतात याच महिलेचे धड आणि शीर आढळून आले. पण अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही. उत्तरीय तपासणीत संबंधित महिला २५ ते ३० वर्षे वयाची असल्याचे निष्पन्न झाले असून, ती आठ महिन्यांची गर्भवती होती. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी व्यक्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी आमणापूर येथे एका महिलेचे दोन्हीही हात आणि पाय तुटलेल्या अवस्थेत मिळून आले होते. याबाबत पलूस पोलीस तपास करत होते. महिलेचा मृतदेह मिळाला नव्हता. शुक्रवारी सायंकाळी येळावी हद्दीत एका शेतात या महिलेचा मृतदेह आणि शीर आढळून आले. उत्तरीय तपासणीत महिलेच्या डोक्यात, नाकावर, छातीवर मारहाण केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आठ महिन्यांची गर्भवती असणाऱ्या या महिलेचा पोटातील बाळ अर्धवट बाहेर आले होते. पुरुष जातीचे अर्भक असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तुटलेल्या हातात बेंटेक्सच्या बांगड्या, हातावर इंग्रजित एस. एस. असे लिहिल्याचे आढळून आले. वैद्यकीय तपासणीनुसार या महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. तसेच सात ते आठ महिन्यांची गरोदर स्त्री असून, उंची १५३ सेमी आहे. हा खून मंगळवारी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)