सावळजला बंगला फोडला
By Admin | Updated: June 1, 2014 01:09 IST2014-06-01T01:06:33+5:302014-06-01T01:09:27+5:30
नऊ लाखांचा ऐवज लंपास : ३५ तोळे सोने, दीड किलो चांदीचा समावेश

सावळजला बंगला फोडला
तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील ‘साईप्रसाद’ हा बंगला फोडून सुमारे ३५ तोळे सोन्याचे व दीड किलो चांदीचे दागिने आणि रोख १० हजार असा नऊ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नारायण गणपती पाटील यांचा हा बंगला असून, घरात कोणी नसल्याचे पाहून कटावणीच्या सहाय्याने कुलपे उचकटण्यात आली आहेत. ही घटना आज, शनिवारी सकाळी उघड झाली असली तरी चोरी दोन दिवसांच्या कालावधीत घडली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेने सावळज परिसरात खळबळ उडाली. नारायण पाटील व त्यांची पत्नी सुमन हे दोघेच घरात राहतात. पाटील निवृत्त मुख्याध्यापक, तर सुमन पाटील या वायफळे जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुख आहेत. त्यांचा एक मुलगा निशिकांत पुण्यात, तर दुसरा मुलगा नंदकुमार हा नोकरीसाठी बंगलोरला असतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी नारायण पाटील पत्नीसह पुण्याला मुलाकडे दि. १६ मेरोजी गेले होते. सावळजला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एकवीरानगरमध्ये भरवस्तीत त्यांचा बंगला आहे. आज सकाळी पाटील यांच्या बंगल्याचे कुलूप रस्त्यावर पडल्याचे व दरवाजा उघडा असल्याचे शेजारी राहणार्या रामचंद्र तोडकर यांच्या लक्षात आले. चोरी झाल्याचा संशय आल्याने तोडकर यांनी पोलिसांसह पाटील यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. दुपारी चारच्या दरम्यान नारायण पाटील आल्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील लक्षात आला. घरातील तीन तिजोर्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. सुमन पाटील व त्यांच्या दोन सुनांसह लहान मुलांचे दागिने वेगवेगळ्या कपाटात ठेवण्यात आले होते. कपाटांचे लॉकर फोडून आतील कपडे, इतर साहित्य बाहेर उचकटून टाकून दागिने लंपास करण्यात आले आहेत. रात्री जत, विटा, सांगली, तासगाव व स्थानिक गुन्हे अन्वेषण, गुन्हे प्रगटीकरण अशा विविध शाखांच्या पोलिसांनी घटनास्थळी भेटी दिल्या. ठसेतज्ज्ञही दाखल झाले होते. चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील असा : दोन नेकलेस (पाच तोळे), कंगण जोड (चार तोळे), बिंदल्या, मनगट्या व पाच अंगठ्या (चार तोळे), एक साखळी (दीड तोळे), चार बिलवर (पाच तोळे), एक जोड पाटल्या (पाच तोळे), कानातील वेल (आठ ग्रॅम), एक गंठण (साडेचार तोळे), एक लक्ष्मीहार (सव्वा तोळे), बोरमाळ दोन नग (दीड तोळे), लेडीज अंगठ्या (एक तोळे), रिंगा (अर्धा तोळा), फुले चार नग (अर्धा तोळा) व एक मंगळसूत्र (अर्धा तोळा). चांदीची २०० नाणी (एक किलो), दोन गणेशमूर्ती (१०० ग्रॅम), पैंजण, हातकंगण व दोन वाळे (१५० ग्रॅम), मेखला, दोन आरत्या, दोन समया, दोन वाट्या, एक अत्तरदाणी (७५० ग्रॅम), दोन करदोडे (२५० ग्रॅम), एक गुलाबदाणी (७५० भार) व रोख १० हजार. पोलिसांनी पंचनाम्यात ७ लाख ४९ हजार रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाल्याचे म्हटले असले तरी, बाजारभावानुसार ही किंमत नऊ लाखावर जाते. (वार्ताहर)