‘सोनहिरा’च्या शरद कदम यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:01 IST2016-01-10T00:54:48+5:302016-01-10T01:01:37+5:30
मान्यवरांची उपस्थिती : वसंतदादा शुघर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजन

‘सोनहिरा’च्या शरद कदम यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार
वांगी : मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद फत्तेसिंग कदम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा व उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते गेली ३१ वर्षे सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात कार्यरत आहेत. दुष्काळी भागात असलेल्या सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात आसवनी प्रकल्प उभारण्यात आला असून, २२ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचीही उभारणी झाली आहे. हे दोन्ही प्रकल्प उत्कृष्टरित्या सुरू आहेत. साखर कारखानदारीतील बदलत्या आव्हानांना सामोरे जात असताना कदम यांनी उत्तम दर्जाचे प्रशासन चालविले आहे. (वार्ताहर)