आबा-भाऊंच्या आठवणींनी शांतिनिकेतन परिसर गहिवरला

By Admin | Updated: January 18, 2016 00:33 IST2016-01-18T00:03:05+5:302016-01-18T00:33:48+5:30

माजी विद्यार्थी मेळावा : दिग्गजांच्या स्मृतींना उजाळा

Shantiniketan campus filled with memories of Aba-bhaus | आबा-भाऊंच्या आठवणींनी शांतिनिकेतन परिसर गहिवरला

आबा-भाऊंच्या आठवणींनी शांतिनिकेतन परिसर गहिवरला

सांगली : मकर संक्रांतीनंतरचा येणारा रविवार शांतिनिकेतनसाठी दरवर्षी खास असतो... शांतिनिकेतनमध्ये घडलेले आणि राज्यभर आपले कर्तृत्व सिध्द करणारे माजी विद्यार्थी हक्काने आपला रविवार शांतिनिकेतनच्या सान्निध्यात घालवत आठवणींना उजाळा देतात, मात्र यंदाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यावर दिग्गजांच्या आठवणींची झालर स्पष्टपणे दिसून आली. राज्याच्या कारभारात व्यस्त असतानाही माजी विद्यार्थी मेळावा कधीही न चुकवणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मदन पाटील यांच्या आठवणींनी रविवारी शांतिनिकेतन परिसर गहिवरला.
दिवंगत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शांतिनिकेतनमध्ये अनेकांनी आपल्या कष्टाचे चीज करत आयुष्य घडविले. त्या प्रत्येकाच्या विचारसरणीवर पी. बी. सरांच्या विचारांचा प्रभाव नेहमीच दिसून येतो. आपल्या स्वच्छ प्रतिमेने राज्य कारभाराचा आदर्श निर्माण करणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील हे शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थीच. मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी आबा आपल्या जुन्या सवंगड्यांच्या सान्निध्यात थांबत असत. गेल्यावर्षीच्या माजी विद्यार्थी मेळाव्यावेळीही आबा अनुपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याने आपले आबा निश्चितपणे बरे होऊन पुन्हा आपल्या गप्पांत सामील होतील, असा विश्वास त्यांच्या मित्रांना होता, मात्र त्यांच्या निधनानंतर या रविवारी झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आबांच्या आठवणींचा गहीवर दाटून आला होता. माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झालेले आबांच्या आठवणीत रमून गेले होते.
आर. आर. आबांबरोबरच शांतिनिकेतनच्या कार्यक्रमाचा भाग असणारे दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे मदनभाऊ पाटील. शांतिनिकेतनमधील माजी विद्यार्थी मेळाव्यासह इतर सर्व कार्यक्रमात भाऊंचा सहभाग महत्त्वाचा असायचा. आबा व भाऊंमधील मैत्रीचे दर्शनही घडत असे. अनेकदा ते वेळ काढून या मेळाव्यात बुद्धिबळाच्या पटावर रमत असत. तीन महिन्यांपूर्वी मदनभाऊंनीही आपल्यातून ‘एक्झीट’ घेतली. गेल्यावर्षी झालेल्या मेळाव्यास मदनभाऊ आवर्जून उपस्थित होते. यावर्षी आबांबरोबरच भाऊंचीही उणीव प्रकर्षाने प्रत्येकाला जाणवत होती.
यंदा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेतही पी. बी. सर, सा. रे. पाटील, आर. आर. आबा, मदन भाऊ आणि मार्इंची रांगोळी कला विश्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटली होती. ही रांगोळी पाहणारा प्रत्येकजण या दिग्गजांच्या आठवणीत रमून जात होता. (प्रतिनिधी)


दिमाखदार कार्यक्रम
यंदा गौतम पाटील यांनी पुढाकार घेत माजी विद्यार्थी मेळाव्याबरोबरच राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि कर्मयोगी पुरस्कार वितरणाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. शांतिनिकेतन परिवारातील सदस्यांनी याला मोठी उपस्थिती लावत कार्यक्रम दिमाखदार केला.

Web Title: Shantiniketan campus filled with memories of Aba-bhaus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.