शंकरराव खरातांची शासनाकडूनही उपेक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:54+5:302021-09-17T04:31:54+5:30
अविनाश बाड आटपाडी : रामा, तुझ्या बहिणीस मुंबईत देवाज्ञा झाली... ही एक ओळीची तार वाचण्यासाठी दोन मण लाकडे फोडणाऱ्या ...

शंकरराव खरातांची शासनाकडूनही उपेक्षाच
अविनाश बाड
आटपाडी
: रामा, तुझ्या बहिणीस मुंबईत देवाज्ञा झाली... ही एक ओळीची तार वाचण्यासाठी दोन मण लाकडे फोडणाऱ्या एका तराळाचा मुलगा सर्व अडचणींवर मात करून चक्क विद्यापीठाचा कुलगुरू झाला. जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण केले. पण त्यांच्या जन्मभूमीत त्यांची उपेक्षा आजही कायम आहे. थोर साहित्यिक शंकरराव खरात यांचे स्मारक आता त्यांचे कुटुंबीय स्वखर्चातून जमेल तसे बांधण्याच्या विचारात आहेत.
अतिशय हालाखीच्या परिस्थितीत मेलेल्या जनावरांचे मांस खाऊन, मृतदेहाची वस्त्रे वापरून आणि शाळेच्या बाहेर बसून शंकरराव खरात यांनी शिक्षण घेतले. त्यांनी १० कादंबऱ्या,१२ कथासंग्रह, ५ ललीत वाङमय, ८ विवेकग्रंथ याशिवाय अनेक पुस्तके, लेख लिहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी काम केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. पुणे विद्यापीठाने सन्मानाने त्यांना डी लीट. ही पदवी बहाल केली.
त्यांचे दि ९ एप्रिल २००१ रोजी निधन झाले. वीस वर्षे झाली तरी त्यांच्या स्मारकाच्या केवळ घोषणाच होत आहेत. वैतागून त्यांच्या कुटुंबीयांची नुकतीच पुणे येथे बैठक झाली. आटपाडीत जेवढी शक्य होईल तेवढी जागा विकत घेऊन शक्य होईल तेवढे आपणच करण्याचे ठरले.
चौकट
खासदार-आमदार काय कामाचे?
शंकरराव खरात यांचे नुकतेच जन्मशताब्दी वर्ष झाले. शासन काही निर्णय घेईल ही अपेक्षा फोल ठरली. जागतिक कीर्तीचा विचारवंत आणि आटपाडीची जगभर प्रेरणा देईल अशी सस्केस स्टोरी निर्माण करणारा, १९८१ साली प्रकाशित झालेल्या तराळ- अंतराळ या आत्मचरित्राची इंग्रजीसह भाषांतरे झालेला नायक उपेक्षित राहिला. खासदार संजयकाका पाटील, आ. अनिल बाबर आणि आ. गोपिचंद पडळकर यांचे याकडे कधी लक्ष जाणार, हा प्रश्न आहे.
कोट
अजून किती दिवस शासन काही करेल म्हणून वाट पाहायची? कुटुंबीय आमच्या आर्थिक कुवतीनुसार जागा विकत घेऊन पत्र्याचे छप्पर करून स्मारक निर्माण करण्याच्या मुद्यावर विचार करीत आहोत. गेली १५ वर्षे सर्व मुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री, आमदारांना भेटून, पत्रे पाठवून थकलो.
-विलासराव खरात,
सचिव, शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी.