मिरज तालुक्यात प्रस्थापितांना हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:30+5:302021-01-21T04:24:30+5:30
कोरोना साथ व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २२ गावांतील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने झाली. अनेक गावात प्रस्थापितांना तरुणांनी आव्हान दिले ...

मिरज तालुक्यात प्रस्थापितांना हादरा
कोरोना साथ व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २२ गावांतील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने झाली. अनेक गावात प्रस्थापितांना तरुणांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत तरुण मंडळी सक्रिय झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. निष्क्रिय असलेल्या नेत्यांना मतदारांनी धडा शिकविल्याचे चित्र आहे. लॉकडाऊननंतर झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात नेहमीचाच जल्लोष, गावागावांत चुरस व प्रचारातील उत्साह, मोठा खर्च व कशाचीच कमतरता नसल्याचे दिसून आले. मालगावसारख्या मोठ्या गावात भाजपचेच दोन गट परस्पराविरोधात उभे ठाकल्याने येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीला महत्त्व आले आहे. एरंडोली, आरग, शिपूर यासह लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या गावांतही मोठी चुरस झाली. तालुक्याच्या पश्चिम भागात काही गावात काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत झाली. काही गावांत राष्ट्रवादीच्या माध्यमातून जयंत पाटील यांचा गट मजबूत झाला. गावागावांतील पाणी, स्वच्छता, आरोग्य यासह मूलभूत समस्यांपेक्षा वैयक्तिक मतभेद व जिरवाजिरवीच्या राजकारणावर या निवडणुकीत भर होता.
एरंडोलीत प्रस्थापितांना धक्का देऊन नवखे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील बड्या नेत्यांच्या सत्तेला हादरे बसले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गटाचा म्हैसाळमध्ये पराभव करून भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे गटाने एकतर्फी विजय मिळविला. मालगावातही राष्ट्रवादी नेते आप्पासाहेब हुळळे यांचे पुत्र पराभूत होऊन हुळ्ळे गटाला एकच जागा मिळाली. शिंदेवाडीत स्थानिक आघाडीने राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत केली. आमदार सुरेश खाडे यांनी १७ गावांत भाजपचे १३६ सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे. विजयनगर (म्हैसाळ) येथे भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे व राजू कोरे यांच्या गटाने सर्व नऊ जागांवर विजय मिळवीत वर्चस्व राखले. लिंगनूर येथे भाजपप्रणीत आघाडी विजयी झाली. सत्तांतर झालेल्य़ा अनेक गावांत यापुढील काळात राजकीय उलथापालथी होणार आहेत.