शाहूवाडीचा रानमेवा शिराळ्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:05+5:302021-03-31T04:26:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : दरवर्षी एप्रिल महिन्यापासून ग्रामीण भागात लोकांना रानमेव्याची चाहूल लागले. शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणारे बांधव ...

शाहूवाडीचा रानमेवा शिराळ्यात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : दरवर्षी एप्रिल महिन्यापासून ग्रामीण भागात लोकांना रानमेव्याची चाहूल लागले. शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणारे बांधव उदरनिर्वाहासाठी हा रानमेवा शिराळा पश्चिम भागातील गावा-गावात फिरून विकतात. करवंदे, जांभळांची चव चाखायला अजून वेळ असला तरी, ‘नेरली’ नावाचा रानमेवा मात्र आता विक्रीला येऊ लागला आहे.
शिराळा तालुक्यात एप्रिल, मे, जून या महिन्यात प्रतिवर्षी खवय्यांना रानमेव्याची चव चाखायला मिळते. शिराळा पश्चिम व लगतच्या शाहूवाडी तालुक्यातील डोंगरदऱ्या या रानमेव्याचे उगमस्थान आहे. शिराळ्यापेक्षा शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, पुसार्ळे, आळतूर, उदगिरी भागातील धनगर बांधव प्रतिवर्षी जंगलातील जांभळे, कारवंदे , काजू, चिकन्या, नेरली, डोंबलं आदी रानमेवा तोडून ते गावा-गावात फिरून विकतात. डोंगरभागात या बांधवांना उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने हा रानमेवाच त्यांच्या चरितार्थाचा आधार बनतो.
पुनवत, खवरेवाडी भागात ही नेरली विक्रीसाठी येऊ लागली आहेत. नेरलीबरोबरच आळूही विक्रीसाठी येऊ लागले आहेत. जांभळे, कारवंदे पिकायला अजून थोडा काळ जावा लागणार आहे.
एकंदरीत रानमेव्याच्या विक्रीतून या बांधवांना चरितार्थाचे साधन मिळाले असून, गतवर्षी कोरोनामुळे हुकलेला हंगाम यंदातरी लाभणार का? ही चिंता त्यांना सतावू लागली आहे.
————-