सांगली संस्थानच्या गणपतीला शाही निरोप

By Admin | Updated: September 10, 2016 00:42 IST2016-09-09T23:08:50+5:302016-09-10T00:42:27+5:30

विसर्जन मिरवणूक : भाविकांची अलोट गर्दी; ढोल, ताशे, झांज, लेझीम, सनई-चौघडे, बॅन्डचा निनाद

Shahi greetings to Ganpati of Sangli Institute | सांगली संस्थानच्या गणपतीला शाही निरोप

सांगली संस्थानच्या गणपतीला शाही निरोप

सांगली : येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणरायाला शुक्रवारी पाचव्यादिवशी शाही विसर्जन मिरवणुकीद्वारे भावपूर्ण निरोप देण्यात आला. राजवाड्यातील दरबार हॉलपासून सरकारी घाटापर्यंत रथातून श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून विसर्जन झाले.
विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. ‘श्रीं’ची विधिवत पूजा झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, पौर्णिमा पटवर्धन या मुलींसह जावई हिमालय, नातू अभिमन्यू दासानी, अभिनेत्री शिबा, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. पानसुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये महापौर हारूण शिकलगार, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शेखर माने, जनसुराज्यचे नेते समित कदम, मानसिंग शिंदे, अनिल पाटील-सावर्डेकर सहभागी झाले होते. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, नादप्रतिष्ठाचे ढोल-ताशा, ध्वजपथक, सांगलीवाडी येथील दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालयाचे लेझीमपथक, हलगीपथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बँड सहभागी झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती.
सुरुवातीला मिरवणूक काही काळ राजवाडा चौकात थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती झाली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले व प्रसादाची उधळण करण्यात येत होती. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
गणपतीपेठेतून मिरवणूक जाताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर भाविकांनी मोठा जयघोष केला. त्यानंतर टिळक चौक मार्गे मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवूने ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ अशा जयघोषात श्रींची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी)

जावई, नातू परंपरा चालवतील : विजयसिंहराजे
‘वयाची ७४ वर्षे पूर्ण करून आता मी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदापासून संस्थान गणपतीच्या उत्सवात जावई हिमालय व नातू अभिमन्यू हेही सहभागी झाले आहेत. ही परंपरा त्यांनी अशीच पुढे चालवावी, अशी माझी इच्छा आहे. मला शक्य आहे तोपर्यंत मी या उत्सवात सहभागी होणार आहे. त्यानंतर पटवर्धन घराण्याची पुढील पिढी ही परंपरा कायम ठेवेल’, असे भूतपूर्व संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


शिबाचा नवस
संस्थानच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री शिबा याही सहभागी झाल्या होत्या. दरबार हॉलमधील श्रींच्या विधिवत पूजेवेळी त्या उपस्थित होत्या. ‘गणरायाच्या चरणी मी नवस बोलण्यासाठी आले आहे. माझा नवस पूर्ण झाल्यावर पुढीलवर्षी मी देवाकडे काय मागितले, ते सांगेन’, असे त्या म्हणाल्या.

 

Web Title: Shahi greetings to Ganpati of Sangli Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.