इस्लामपुरात शहाजीबापू पाटील यांची गोची
By Admin | Updated: October 27, 2016 23:28 IST2016-10-27T21:31:05+5:302016-10-27T23:28:51+5:30
मुलाखतींचा फार्स : प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत खेळ्या; मलगुंडे यांच्यासाठी पक्षाची जबाबदारी

इस्लामपुरात शहाजीबापू पाटील यांची गोची
अशोक पाटील -- इस्लामपूर --पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुलाखतीचा फार्स झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक शहाजीबापू पाटील व माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी प्रभाग क्र. १३ मधून आपली उमेदवारी निश्चित मानून संपर्क सुरू केला आहे. शहाजीबापू पाटील यांना प्रभाग क्र. १४ मध्ये प्राधान्य आहे, असे गृहीत धरूनच त्याठिकाणी माजी नगरसेवक विजय कोळेकर यांना संधी देण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे पाटील यांची उमेदवारीसाठी गोची झाली आहे.
प्रभाग ६ मध्ये शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांच्याविरोधात कपिल ओसवाल विरोधी गटातून उभे होते.
दोघांकडे ताकद असतानाही शहाजी पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळेच आमदार जयंत पाटील यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊन न्याय दिला. नगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. शहाजी पाटील यांनी प्रभाग १३ मधून उमेदवारी मागितली आहे. परंतु या प्रभागात पोषक वातावरण असल्याचा दावा करत मलगुंडे यांनीही याच प्रभागातून लढण्याचा निर्धार केला आहे. ११/१२ च्या राजकारणात मलगुंडे यांनी सत्ताधाऱ्यांकडून नगराध्यक्षपद हिसकावून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे. प्रभाग १४ खुला असल्याने शहाजी पाटील यांनी तेथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा असतानाच, विजय कोळेकर यांनीही याच प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे शहाजी पाटील यांची प्रभागावरुन गोची निर्माण झाली आहे.
भावकी : राजकारण..!
प्रभाग १० ते १४ मध्ये भावकी, गटा-तटाचे राजकारण रंगले आहे. प्रभाग ११ मध्ये मानाजी पाटील वाड्यातील मनीषा पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. त्याच प्रभागात शंकर पाटील, मोरे भावपणातील आबा मोरे यांच्यात चुरस आहे, तर प्रभाग १० मधून अरुणादेवी पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवाजी पवार यांच्या मातोश्री सुशिला पवार यांनी राष्ट्रवादीतून आपली उमेदवारी निश्चित केली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या सीमा राजू पवार यांना उमेदवारी मिळणार आहे.
प्रभाग १३ व १४ खुल्या (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतु इतर समाजातील उमेदवारी देऊन या प्रभागावर राष्ट्रवादी बळजबरी करत आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही. शहाजी पाटील हे प्रभाग १३ मधूनच निवडणूक लढवतील.
- आनंदराव इंगळे, सदस्य, राष्ट्रवादी, इस्लामपूर.