द्राक्षबागांच्या बचावासाठी आता शेडनेटचा पर्याय!

By Admin | Updated: February 23, 2015 00:15 IST2015-02-23T00:09:18+5:302015-02-23T00:15:28+5:30

मिरज पूर्वभागातील चित्र : कडक ऊन, धूळ, कारखान्यांच्या धुराड्यातील राखेची उत्पादकांना धास्ती

ShadeNet's choice now for grape rescue! | द्राक्षबागांच्या बचावासाठी आता शेडनेटचा पर्याय!

द्राक्षबागांच्या बचावासाठी आता शेडनेटचा पर्याय!

प्रवीण जगताप - लिंगनूर : मिरज पूर्वभागातील सर्वात उशिरा फळछाटणी घेतलेल्या द्राक्षबागांतील द्राक्षघडांना आता हवामान चांगले असले तरी, कडक ऊन, रस्त्यावरून उडून येणारी धूळ, कारखान्यांच्या धुराड्यातून येणारी राख यांचा फटका बसू लागला आहे. द्राक्षासारखे नाजूक पीक सांभाळताना आधीच हजारो रुपयांचा औषधांचा खर्च झाला आहे. आता ऊन, धूळ, राख यांच्यापासून द्राक्षघडांचा बचाव करण्यासाठी जाळी (शेडनेट), साड्या यांचा आधार घेतला जाऊ लागला आहे.
मिरज पूर्वभागात सोनाक्का जातीच्या द्राक्षांची लागवड वाढत आहे. काही द्राक्षे मऊ जातीची आहेत. द्राक्षमण्यांवरील आवरण मऊ असल्याने बागेच्या कडेला उन्हाचे चटके बसून काही घडांचा रंग बदलतो. घडावर लालसर तपकिरी रंगाचे चट्टे तयार होतात. परिणामी व्यापारी दर पाडू शकतात. बागेवर साड्या टाकल्यामुळे तीव्र उन्हापासून बचाव करता येतो. या साड्यांमुळे पाखरांपासूनही द्राक्षघडांचे रक्षण करणे सोपे जाते. मिरज पूर्वभागात आरग येथे साखर कारखाना सुरू आहे, तर सीमावर्ती खटावपासून चार किलोमीटरवर केंपवाड कारखाना आहे. या कारखान्यांच्या धुराड्यातून येणारी राख परिसरात पंधरा किलोमीटरपर्यंत वाऱ्याने उडून जाते व ती द्राक्षघडांवरही येऊन पडते. त्यामुळे द्राक्षघडांना आलेली नैसर्गिक दुधी रंगाची चमक नष्ट होत आहे. त्याचा दरावर परिणाम होतो. साड्यांचे आवरण बाजूने व वरून घातल्याने या राखेपासूनही काहीअंशी द्राक्षांचा बचाव करता येतो.
बऱ्याच बागा रस्त्याकडेला आहेत. वाहनांमुळे उडणारी धूळ रस्त्यालगत असणाऱ्या द्राक्षघडांवर जाऊन फटका बसतो. पानेही धुळीने माखल्याने घड व पिकावर परिणाम होतो. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने शेडनेट लावणे, जाळ्या लावणे, तट लावणे, कडवळसारख्या चराऊ उंच चारा लावणे या उपायांद्वारे बचाव केला जात आहे.


 

Web Title: ShadeNet's choice now for grape rescue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.