पुनवत : आरळा (ता. शिराळा) येथील गांधी सेवाधाम विद्यालयाने चांदोली जंगल परिसरात विविध जातीच्या सात हजार बियांची लागवड केली. निसर्ग संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांनी केले. शिक्षक, वनविभाग व विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. सुधीर बंडगर हे विविध उपक्रम राबवित असतात. त्यांनी विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध बियांचे संकलन करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फणस, आंबा, जांभूळ, चिंच, हिरडा आदी झाडांच्या प्रकारच्या सात हजार बिया जमा केल्या. सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोलीचे वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिमझिम पावसात चांदोली जंगल परिसरातील डोंगर उतारावर या बियांची लागवड करण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांचा सहभागविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राथमिक शिक्षक आर. सी. पाटील, मजीद गणी मुजावर यांनीही सीतेचा अशोक व हिरडा या वृक्षांच्या तब्बल तीन हजार बीया देऊन पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभाग घेतला. मुख्याध्यापक ए. एस. घोरपडे यांनी कौतुक केले. यासाठी जास्त बिया संकलित करणाऱ्या सायली वसंत पाटील, देवयानी बाळू पाटील, आलिया अस्लम मुजावर, रुद्र अधिक भेडसगावकर, अनुष्का शांतिनाथ पोतदार या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यासाठी वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील, वनपाल विजय दाते, वनरक्षक सुभाष वसावे, समाधान मंचरे, तेजश्री नरळे, जंगल मार्गदर्शक गणेश पाटील, पर्यवेक्षक एच. ए. मुलाणी यांनी सहकार्य केले.