वाळू माफियांच्या शोधासाठी सात पथके
By Admin | Updated: November 23, 2014 23:53 IST2014-11-23T23:12:13+5:302014-11-23T23:53:42+5:30
राजापूर हल्ला प्रकरण : तासगावात आज ग्रामस्थांचे धरणे

वाळू माफियांच्या शोधासाठी सात पथके
कवठेएकंद : राजापूर (ता. तासगाव) येथील येरळा नदीच्या पात्रात वाळू उपशाला विरोध करणाऱ्या येरळा बचाव कृती समितीच्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांच्या शोधार्थ पोलिसांची सात पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नाही.
दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात राजापूर ग्रामस्थांच्यावतीने काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर मोक्का कायदा लावून कारवाई करावी, या मागणीसाठी राजापूर येथे गावबंद करून आंदोलन करण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्री येरळा नदीत वाळू माफियांनी येरळा बचाव समितीच्या शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये वाळू माफियांनी लोखंडी गज, काठ्या, खोऱ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामध्ये सहा शेतकरी जखमी झाले.
संजय पाटील, महादेव पाटील, पोपट हजारे, विजय पाटील, वसंत पवार व दाजी पवार हे शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी दिनकर पाटील, जमीर शेख, अण्णासाहेब यलमार, दादासाहेब पाटील (सर्व रा. शिरगाव, ता. तासगाव) यांच्यासह ३० अज्ञातांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भ्याड हल्ल्याचा राजापूर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राजापूर गावबंद करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
संबंधित वाळू माफियांवर मोक्का लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे दरम्यान, या प्रकरणी वाळू माफियांचा शोध घेण्यासाठी तासगाव, पलूस, भिलवडी, कुंडल या पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सात पथके रवाना झाली आहेत. सावर्डे, कौलगे, बोरगाव, भिलवडी, पलूस, वायफळे, सावळज यासह जिल्ह्यातील इतर गावात त्यांचा शोध चालू आहे. माफियांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेही टाकले. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)
मोक्काची मागणी
राजापूर येथील येरळा नदीत वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. याबाबत ग्रामस्थांनी महसूल व पोलीस यंत्रणेकडे तक्रारीही केल्या. पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच वाळू चोरी रोखण्याचा निर्धार केला. पण काल वाळू माफियांनी ग्रामस्थांवरच हल्ला केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या वाळू माफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.