मिरजेत दोन लाखाच्या दारूसह सात लाखाचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:47+5:302021-05-31T04:20:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज-म्हैसाळ रस्त्यावर विजयनगरजवळ गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी सुमो जीप पकडून ग्रामीण ...

मिरजेत दोन लाखाच्या दारूसह सात लाखाचा ऐवज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज-म्हैसाळ रस्त्यावर विजयनगरजवळ गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी सुमो जीप पकडून ग्रामीण पोलीस पथकाने दोन लाखाची दारू व जीप असा सात लाखाचा ऐवज जप्त केला.
गोवा बनावटीची दारू घेऊन सुमो जीप येणार असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून वेषांतर करून सापळा रचला होता. रविवारी सकाळी पोलिसांना अवैध दारू घेऊन येणारी टाटा सुमो दिसली. गाडी थांबविणाऱ्या पोलिसांना पाहून सुमो चालकाने गाडी वेगात पळविल्याने पोलिसांनी पाठलाग करत विजयनगरजवळ सुमो पकडली. दोन लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारूसाठा व सुमो जीप असा सात लाखाचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. जीपमधील चौघेजण गाडी सोडून फरार झाले. गाडी चालकाचा मोबाईल व वाहन परवाना गाडीत सापडल्याने सुमो चालक अजय आबासाहेब शिंदे यास अटक करून सुमो जप्त करण्यात आली. अवैध दारू बाळासाहेब पंडित तांबे (रा. लक्ष्मीनगर, मालगाव) याची असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले. याप्रकरणी आणखी तिघेजण फरार असून मिरज ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
लाॅकडाऊन काळात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी जोमात असून शनिवारी शहर पोलिसांनी मोटारीतून नेण्यात येत असलेला दारूसाठा पकडला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूवर कारवाई करण्यात आली.