सात कोविड रुग्णालयांत फायर सिलिंडरदेखील नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:35+5:302021-04-25T04:26:35+5:30
सांगली : सांगली-मिरजेतील सात खासगी कोविड रुग्णालयांत साधा फायर एक्सटिनगिशरदेखील नसल्याचे अग्निशमन विभागाच्या पाहणीत आढळले. मिरज रस्त्यावरील एक खासगी ...

सात कोविड रुग्णालयांत फायर सिलिंडरदेखील नाही
सांगली : सांगली-मिरजेतील सात खासगी कोविड रुग्णालयांत साधा फायर एक्सटिनगिशरदेखील नसल्याचे अग्निशमन विभागाच्या पाहणीत आढळले. मिरज रस्त्यावरील एक खासगी कोविड रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल आहे, तेथे अग्निशमन यंत्रणेचा पत्ताच नसल्याचे दिसले.
राज्यात कोठेतरी रुग्णालयात आग लागते, निष्पाप रुग्ण दगावतात, अशावेळी राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे फर्मान शासन काढते. गेल्या दीड-दोन वर्षांत किमान चारदा असे आदेश निघाले. पण, जुन्या शिफारशींचीच अंमलबजावणी होत नसेल तर नव्याने ऑडिटचा उपद्व्याप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भंडाऱ्यातील आगीनंतर सरकारी रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते, त्याचवेळी सांगली, मिरज सिव्हिलसह जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांची तपासणी झाली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भंडारा दुर्घटनेपूर्वीच ऑडिटचे आदेश दिले होते. तत्पूर्वी सांगली शासकीय रुग्णालयाचे ऑडिट २०१८ मध्ये झाले होते. अग्निशमनविषयी कामांसाठी १ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला, तो अजूनही धूळ खात पडला आहे. आता विरारमधील दुर्घटनेनंतर पुन्हा ऑडिटचे आदेश निघाले आहेत.
सांगली-मिरजेत रुग्णालयांच्या नव्या इमारतींसाठी कोट्यवधींचा खर्च होत असताना अग्निरोधी उपायांसाठी एक-दोन कोटींचाही खर्च केला जात नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. सिव्हिल प्रशासन व सार्वजनिक बांधकामच्या पाहणीत रुग्णालयांच्या भल्यामोठ्या पसाऱ्यात पुरेशी अग्निरोधी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले. ठिकठिकाणी सिलिंडर नाममात्र अडकवून वेळ मारून नेली जात आहे.
सिव्हिलमध्ये स्प्रिंकलर्स, स्मोक डिटेक्टर्स, गरजेनुसार वीजवाहिन्या व अंतर्गत फिटिंग, अग्निशमनासाठी पाणीपुरवठा, नवे फायर एक्स्टीनगिशर्स बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी पावणेदोन कोटींची फाईल आरोग्य संचालनालय, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम या सर्वांकडे फिरून आली आहे; पण निर्णय झालेला नाही. राज्यात दुर्घटना घडताच ऑडिटच्या वल्गना करणारे शासन शुद्ध फसवणूक करीत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.
चौकट
यंत्रणा सुसज्ज, कर्मचारीच नाही
सांगली, मिरजेतील काही खासगी कोविड रुग्णालयांत सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे. तारांकित रुग्णालयांच्या दर्जाची उपकरणे बसविली आहेत; पण ती हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याचे फायर ऑडिटमध्ये आढळले. ऑडिट सुरू असताना तात्पुरता एखादा कर्मचारी उभा केला जातो, अधिकाऱ्यांची पाठ फिरताच दुर्लक्ष होते. अग्निशमन विभागाने त्यांना नोटिसा बजावल्या असून, प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यास सांगितले आहे.